आरती रमेश कोचरेकर
स्वातंत्र्य मग ते बोलण्याचे असो वा व्यक्त होण्याचे... ते तोंडाचे बोळके झाले तरी लवलवत राहते, वाजत गाजत राहते.
दचकू नका... जरा विचार करून बघा. आजुबाजूला काय दिसते ?
अगदी नवजात जन्मलेले बाळसुद्धा आपले बोळके पसरून चिमुरड्या ताईपासून ते तोंडाचे पार बोळके झालेल्या पणजी पणजोबांपर्यत सगळ्यांना अक्षरशः नाचवते.
त्याच्या शब्दहीन हुंकारांचे अर्थ लावता लावता भलेभले हात टेकतात.
अगं सुनबाई नीट बघ हो, त्याला भूक लागली असेल. अगदी बेंबीच्या देठापासून रडतोय पोर...
पूर्वी टीव्हीवर लागायची ती एक जाहिरात आठवली..
अगं, बाळ का रडतंय..? ग्राइप वॉटर पाज हो त्याला...
एकामागून एक चार-पाच पिढ्या येऊन हे एकच वाक्य बोलत असत.
ते पाहून मला नेहमीच प्रश्न पडे, वैचारिक बौद्धिक स्वातंत्र्य इतके आक्रसले गेले आहे की, एकाच वाक्यावर येऊन संपावे.
मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे... माणसांनी पोट फुटून ओथंबून वाहणारी ही दुसरी मायच जणू. एका आईच्या पोटातून नऊ महिन्यांचा प्रवास संपवून बाहेर आलेला जीव हा जरा मिसरूड फुटते न फुटते तोच या रेल्वे नामक पोटातून आयुष्यभर प्रवास करतो. त्यात त्याच्या भाषेवर, शरीरावर, बुद्धीवर असे काही संस्कार होतात, होत राहतात की ज्याचे नाव ते....
अरे, आत व्हा.. आत व्हा रे... आम्ही पडू आता बाहेर... म्हणत आक्रोश करत बाहेर लटकणारे जरा आत असणाऱ्याला पोट, पाठ, पाय, ढोपर, डोकं इ. अवयवांनी ढोसत राहतात, आपला जीव इंच इंच लढवत वाचवत राहतात. तोंड अफाट वाहत राहते, शिव्या घालत राहते, विनवण्या करत राहते....
अरे, आत सरकाना जरा xxxx, xxxxx भरीला अर्वाच्य शिव्यांचा जपही सुरू होतो. पण आतल्या मख्ख, निर्ढावलेल्या गर्दीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. कारण गर्दीला कान, डोळे, मन हे कोणतेच अवयव असतात.
फक्त हात तेव्हढे दांडा घट्ट पकडून ठेवण्यात गुंतलेले असतात. त्यांना तसूभरही ढील देण्याची मुभा नसते...
बायकांच्या डब्यातली लढाई तर कुरुक्षेत्र मवाळ ठरावे इतकी जहाल असते. शिव्या तर इतक्या इनोव्हेटिव्ह असतात की त्यांची उत्पत्ती नक्की कुठून झाली, हा मोठा संशोधनाचा विषय ठरावा.
अगं म्हशे, जरा हो की आत... आम्ही
काय मागच्या मागे पडून डायरेक्ट स्वर्गात जायचं की काय...
अगं इतकी जीवाची भीती आहे तर मागची गाडी पकडायची ना...
मागची आणि पुढची...चार गाड्या सोडल्या गो बायो... आता ही पण सोडली असती ना तर तो ऑफिसातला टकल्या माझे लोणचेच घालेल आज मसाला भरून...
मग इतक्या साऱ्या हाणामारीतही ही sss खसखस पिकते ....
सगळ्याच जरा रिलॅक्स होतात आणि स्वतःचा आणि इतरांचा देह चेपत चेपत बाहेरचीला ज sss रा आत सामावून घेतात.
अय्या, तुमची साडी अगदी सुंदर आहे हो.. कुठून घेतली? डोंबिवलीतूनच का..? हल्ली आपल्या डोंबिवलीत सुद्धा एकाहून एक सुंदर दुकानं झाली आहेत हो... काही म्हणता काही मिळत नाही असं नाही हो...
आता क्षणापूर्वी एकमेकींच्या झिंझ्या उपटणाऱ्या त्या याच का... असा प्रश्न बघ्याला पडावा. यावरून मला विंदा करंदीकरांचा एक लेख आठवतो. आतले आणि बाहेरचे. किंवा बोली भाषेत जात्यातले आणि सुपातले. जे आत असतात, सुखरूप
असतात ते अळीमिळी गुपचिळी म्हणत तोंडांत मिठाची गुळणी धरून गुपचूप बसतात. कारण बाहेर असताना त्यांनीही बोलण्याचे भरपूर स्वातंत्र्य घेतलेले असते.
आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात जाणारच आहेत याची जाणीव प्रत्येकाने वागताना, बोलताना, व्यक्त होताना केली पाहिजे, म्हणजे आपोआपच सगळे सुरळीत होईल.