नऊ जण सुरक्षित; उबाठातर्फे दोन नगरसेवकांना नोटीस; कारवाईचा इशारा
कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत संख्याबळ वाढवण्यासाठी शिवसेनेने (शिंदे गट) उबाठाचे नगरसेवक फोडण्याचे काम सुरू केले आहे. उबाठातील दोन नगरसेवक शिवसेनेच्या (शिंदे गट) संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. फोडाफोडीपासून दूर कल्याण पू.मधील उबाठाचे नवनिर्वाचित नगरसेवक नितीन खंबायत श्री मलंगगड परिसरातील जंगलात लपून बसल्याची खळबळजनक चर्चा रंगली आहे. दरम्यान उबाठाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी दोघांनाही नोटीस दिली आहे. उद्या पक्षाच्या गट स्थापनेकच्या बैठकीस उपस्थित राहावे, अन्यथा पक्ष विरोधी काम केल्याने पक्षाकडून कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
कडोंमपाचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उबाठाचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह खा. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर उबाठाच्या नगरसेविका ॲड. कीर्ती ढोणे यांनीही खा. श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्याने खळबळ उडाली. या घडामोडींमुळे उबाठासह भाजपमध्येही तीव्र नाराजी आहे.
कल्याणमधील शिवसेनेचे (शिंदे गट) काही मातब्बर नगरसेवक स्वतःच्या प्रभागात पराभूत झाले असताना, त्यांच्या विजयासाठी ताकद लावण्याऐवजी फोडाफोडीवर भर दिला जात असल्याची टीका होत आहे. कल्याण पू. येथील नितीन खंबायत हे उबाठाचे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. त्यांना शिवसेनेत(शिंदे गट) सामील करून घेण्यासाठी दोन दिवसांपासून सतत दबाव टाकला जात असल्याचा आरोप उबाठाडून होत आहे. पक्षांतर बंदी कायद्याची चिंता करू नका, आम्ही सर्व बघून घेऊ, असे सांगण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. दरम्यान, उबाठाचे कल्याण लोकसभा जिल्हा संघटक अभिजीत सावंत यांनी नऊ नगरसेवक सुरक्षित असल्याचा दावा करत ते आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत असे सांगितले.






