मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बोरिवली आणि गोराई दरम्यानचा तासनतासांचा प्रवास आता काही मिनिटांवर येणार आहे. बहुप्रतिक्षित रो-रो (Ro-Ro) जेट्टीच्या कामाला आता वेग आला असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पामुळे सध्या लागणारा दीड तासाचा वेळ वाचून हा प्रवास केवळ १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. सध्या बोरिवलीहून गोराईला जाण्यासाठी रस्ते मार्गाने किंवा साध्या बोटीने बराच वेळ खर्च करावा लागतो. मात्र, नवीन रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, या फेरीतून केवळ प्रवासीच नव्हे, तर वाहनेही ने-आण करणे शक्य होणार आहे. यामुळे पर्यटकांना स्वतःच्या गाड्या थेट गोराई बीचपर्यंत घेऊन जाता येतील.
स्वस्त आणि वेगवान पर्याय
गोराई हे पर्यटनाचे आणि रोजगाराचे मोठे केंद्र आहे. दररोज हजारो नागरिक आणि पर्यटक या मार्गावर १० ते १५ रुपयांत प्रवास करतात. प्रवासाचा दर स्वस्त असला तरी वेळेचा मोठा अपव्यय ही आतापर्यंतची सर्वात मोठी समस्या होती. ही समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने रो-रो फेरीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती, ज्याचे भूमिपूजन काही महिन्यांपूर्वी पार पडले होते. गोराई गावठाण पंचायतीचे सदस्य रॉसी डिसोझा यांनी या प्रकल्पाबद्दल सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या मते, "या आधुनिक जेट्टीमुळे पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होईल. प्रवासाचा वेळ वाचल्यामुळे लोक वारंवार गोराईला येतील, ज्याचा थेट फायदा स्थानिक छोटे व्यावसायिक, हॉटेल मालक आणि तरुणांच्या रोजगाराला होईल."
'आधी रस्ते रुंद करा, मगच जेट्टी सुरू करा' – गोराईकरांची आग्रही मागणी
बोरिवली ते गोराई दरम्यानच्या जलप्रवासाचा वेग वाढविणाऱ्या रो-रो जेट्टीचे काम सुरू झाले असले, तरी स्थानिक पातळीवर या प्रकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जेट्टीमुळे पर्यटकांची गर्दी वाढणार असली, तरी गोराईतील पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेचा प्रश्न रहिवाशांनी ऐरणीवर आणला आहे. पंचायत सदस्य रॉयस्टन गोडिन्हो यांनी या प्रकल्पाबाबत महत्त्वाची चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, गोराईतील सध्याचे रस्ते अत्यंत अरुंद आणि अपघातप्रवण आहेत. काही दिवसांपूर्वीच गोराई खाडीजवळ झालेल्या एका भीषण अपघातात दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. अशा परिस्थितीत, रो-रो फेरीद्वारे मोठ्या प्रमाणात वाहने गोराईत आल्यास वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका अधिक वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
पर्यावरणाचे रक्षण आणि रस्ते रुंदीकरण
स्थानिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, महाराष्ट्र सागरी मंडळाने (MMB) हा प्रकल्प राबवताना केवळ जेट्टीवर लक्ष केंद्रित करू नये. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) खारफुटीच्या झाडांना (Mangroves) कोणतीही इजा न पोहोचवता येथील रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. रस्ते सक्षम केल्याशिवाय या प्रकल्पाचा खरा फायदा स्थानिकांना आणि पर्यटकांना होणार नाही, असे मत मांडण्यात आले आहे. केवळ पर्यटनाचा विचार न करता, दैनंदिन कामासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या सोयीचा विचार व्हावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्यांचा समावेश आहे:
स्वतंत्र रांगा : नोकरी-व्यवसायासाठी जाणाऱ्या नियमित प्रवाशांसाठी चढण्या-उतरण्याची (Boarding-Deboarding) वेगळी व्यवस्था असावी.
भाडे दर : सर्वसामान्य प्रवाशांना परवडतील असे कमी भाडे दर निश्चित करावेत.
विशेष सवलती : गोराईतील स्थानिक आणि रोजच्या प्रवाशांना विशेष 'ट्रॅव्हल पास' किंवा सवलती द्याव्यात.
पर्यटन की डोकेदुखी?
रो-रो फेरीमुळे पर्यटक आपली वाहने थेट गावात घेऊन येणार आहेत. यामुळे स्थानिकांच्या व्यवसायाला चालना मिळणार असली, तरी नियोजनशून्य अंमलबजावणीमुळे गावातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात येऊ नये, असा सूर गोराई गावठाण पंचायतीच्या सदस्यांनी आळवला आहे.