गमनचा अपरांत कादंबरीपासून सुरु झालेला प्रवास आता थेट चित्रपटगृहातील मोठ्या पडद्यावर झळकण्याकरिता तयार आहे. सिनेमाविषयी आवड आणि जिद्दीच्या जोरावर मनोज नाईकसाटम यांनी हा पल्ला गाठला आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते 'नारायण जाधव' आणि 'भेरा’ चित्रपटातील अभिनयाकरिता २०२४ सालचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभलेल्या अभिनेत्री ‘श्रद्धा खानोलकर’ मुख्य भूमिका साकारत आहेत.
उत्तर प्रदेश ते मुंबई आणि मुंबई ते कोकण असा मोठा परीघ या सिनेमाला लाभला आहे. कोकणातील एका खेडे गावात राहणारं एक वृद्ध जोडपं जुजबी उपचाराकरिता मुंबईत स्थायिक असलेल्या आपल्या मुलांकडे आलेले असतात. मुलंही त्यांची उत्तम काळजी घेत असतात पण गावाच्या मोकळ्या वातावणात आयुष्य व्यथित केलेल्या तसेच गावाच्या घराबद्दल आणि शेती-वाडीबद्दल आस्था असलेल्या त्या दोघांचं मन मुंबईत रमत नाही. गणेशोत्सवासाठी हे वृद्ध जोडपं पुन्हा गावी जायला निघतं. मुलं आई-वडिलांना उतारवयात सोबतीला म्हणून उत्तर प्रदेशातील गरजू भाऊ आणि बहीण पाठवतात. पण नियतीने काही वेगळंच योजलेलं असतं.सिनेमा मुंबई आणि कोकण(मालवण) या दोन्ही ठिकाणी चित्रित झाला आहे.