'वंचित'चे दोन नगरसेवक आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर भेट
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत खेळी केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात काहीअंशी यशस्वी ठरली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवक सुरेखा सोनावणे आणि विकास खरात यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले आहे.
आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास तसेच दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी हा पाठिंबा देत असल्याचे दोघांनीही उपमुख्यमंत्री शिंदे यांना स्पष्ट केले. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक योगेश जानकर, शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते. 'वंचित'च्या या निर्णयामुळे उल्हासनगर महापालिकेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






