Tuesday, January 20, 2026

ठाण्यातही महापौर पदावरून भाजपने थोपटले दंड

ठाण्यातही महापौर पदावरून भाजपने थोपटले दंड

“दोन वर्षे महापौर द्या, अन्यथा विरोधात बसून सत्तेवर अंकुश ठेवू”

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) एकहाती सत्ता मिळवली असली तरी, निवडणुकीपूर्वी शिवसेना–भाजप युती असल्याने आता महापौर पदासाठी भाजपने दबाव वाढवला आहे. जागा वाटपात भाजपने नमते घेतले होते पण आता ठाण्यात भाजपचा १०० टक्के स्ट्राईक रेट असल्यामुळे जनतेला दिलेल्या आश्वासनांचे पालन करण्यासाठी महत्त्वाची पदे मिळणे आवश्यक असल्याचा इशारा भाजपचे आमदार संजय केळकर आणि ठाणे निवडणूक प्रभारी आमदार निरंजन डावखरे यांनी दिला आहे.

भाजपची मागणी : महापौर पद हवेच!

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने शिंदे गटाने ८७ जागा लढवून ७५ जिंकल्या, तर भाजपने ३९ जागा लढवून २८ जागा जिंकल्या. त्यामुळे ठाण्यात भाजपने १००% स्ट्राईक रेट राखला आहे. या निकालानंतर महायुतीचा महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले असताना, भाजपनेही महापौर पदाची मागणी केली, ज्यामुळे युतीत तणाव वाढल्याचे दिसून येत आहे.

भाजपचा इशारा : “नाही तर विरोधी बाकावर बसू”

माध्यमांनी आ. डावखरे यांना विचारले की “दोन वर्ष महापौर मागणार का?”, तेव्हा त्यांनी स्पष्ट “हो” असे उत्तर दिले. ठाणेकरांना भाजपने निवडणुकीदरम्यान अनेक आश्वासने दिली असल्यामुळे, तेवढेच महत्त्वाचे पद भाजपला मिळावे, असे डावखरे म्हणाले.

त्यांनी याशिवायही इशारा दिला: “महापौर पद न मिळाल्यास आम्ही विरोधी बाकावर बसून पारदर्शक प्रशासनासाठी चौकीदाराची भूमिका बजावू” असा इशारा देत याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही कळविले असल्याचे आमदार डावखरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजपच्या या पवित्र्यावर शिंदेच्या सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना छेडले असता त्यांनी, आ. निरंजन डावखरे हे भाजपाचे ठाण्यातील नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षातील नगरसेवकांना जास्तीत जास्त पदे कशी देता येतील, हे पाहणे त्यांचे काम आहे आणि त्यानुसार त्यांनी महापौर पदाची मागणी करणे गैर नाही. तरीही, याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असेही म्हस्के म्हणाले.

Comments
Add Comment