जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे पडघम
तळा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक अर्ज भरण्यापूर्वी तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपले खेळ सुरू केले असून उमेदवाराच्या गुणवत्तेपेक्षा तो कोणत्या जातीचा आहे या पातळीवरील स्पर्धेने अधिक, जोर धरला आहे. आपल्या जातीच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांचे डावपेच उघडपणे सुरू झाले आहेत. यामध्ये विविध पक्षांतील स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले असून पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी, शक्तिप्रदर्शन आणि संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आघाडीवर असून शिवसेना आणि भाजप या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
सध्या सुरू असलेल्या उमेदवारी लढाईत राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी आपापल्या पारंपारिक गटांचे समर्थन मिळवण्यासाठी आक्रमकपणे एकमेकांना टाकलेली चाल खूपच चर्चेत आहे. गटबाजीच्या आणि जातीच्या आधारावर उमेदवारांची निवड होत आहे, ज्यामुळे उमेदवाराच्या गुणवत्तेला हद्दपार केले गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात उमेदवारी वरून खलबत सुरू असून, अजूनही कोणालाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु आपल्याच जातीच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी याकरिता ताकद दाखवण्यासाठी काही इच्छुकांनी समर्थकांचा लवाजमा गोळा करून वरिष्ठ नेत्यांपुढे हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. तर काहीजण शांत राहून घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे जातीच्या राजकारणात पक्षांतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसत असून "आपलाच उमेदवार कसा योग्य" हे सिद्ध करण्यासाठी अंतर्गत राजकारण रंगात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र मागील निवडणुकांतील कामगिरी, वैयक्तिक संपर्क, आर्थिक क्षमता आणि स्थानिक प्रभाव या मुद्द्यांवर उमेदवारी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जातीचे राजकारण उफाळून आल्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही त्याचबरोबर एखाद्या नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यास जुन्या पदाधिकाऱ्यामध्ये देखील अस्वस्थता पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने अजूनही उमेदवारी संदर्भात गुप्तता पाळण्यात येत आहे.
राजकीय पक्षात देखील गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर असून मर्जीतल्या कार्यकर्त्याला संधी मिळावी यासाठी सर्वच गट आता आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. "घराघरांत पोहोचणारा, जनतेशी थेट संपर्क असलेला उमेदवार देण्यावर भर दिला जाईल," असे राजकीय पक्षाचे नेते म्हणत असले तरी तो कुठल्या जातीचा आहे यावर जास्त लक्ष केंद्रित झाले असून उमेदवाराची गुणवत्ता मतदार संघातील स्थानिक प्रश्न, विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण हे मुद्दे आता बाजूला सारून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.