Monday, January 19, 2026

उल्हासनगर महापालिकेच्या सत्तेची चावी ५० टक्के मराठी नगरसेवकांच्या हाती

उल्हासनगर महापालिकेच्या सत्तेची चावी ५० टक्के मराठी नगरसेवकांच्या हाती

उल्हासनगर : एकेकाळी सिंधी भाषिकांचे शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगरमध्ये यंदा महापालिका निवडणुकीत मराठी नगरसेवकांनी ५० टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. एकूण ७८ जागांपैकी ३९ जागांवर मराठी नगरसेवक निवडून आल्याने, आता मुंबईच्या धर्तीवर उल्हासनगरमध्येही मराठी महापौराची मागणी जोर धरू लागली आहे. फाळणीच्या काळात विस्थापित झालेल्या सिंधी समाजाला कल्याणलगतच्या ब्रिटिशकालीन लष्करी छावणीत व खुल्या जागांवर वसवण्यात आले. उल्हास नदीमुळे शहराला ‘उल्हासनगर’ हे नाव मिळाले. आजही येथे सिंधी समाजाचा प्रभाव दिसून येतो. अनेक सिंधी कुटुंबे ठाणे, कल्याण, अंबरनाथ आदी शहरांकडे स्थलांतरित होत असताना मराठी व उत्तर भारतीय समाजाची संख्या वाढली आहे.

महापालिका निवडणुकीत ७८ पैकी ३९ म्हणजे ५० टक्के मराठी नगरसेवक निवडून आले आहेत. सिंधी समाजाचे २९ (३७ टक्के) नगरसेवक असून, शीख तसेच उत्तर भारतीय–बंगाली समाजाचे प्रत्येकी ५ नगरसेवक आहेत. शिवसेना (शिंदे गट) व ओमी टीमने एकूण ३६ जागा पटकावल्या आहेत. त्यापैकी २२ मराठी, ८ सिंधी, ४ शीख आणि उर्वरित उत्तर भारतीय–बंगाली समाजातील आहेत. भाजपच्या ३७ नगरसेवकांपैकी २० सिंधी समाजाचे, १३ मराठी, १ शीख आणि ३ उत्तर भारतीय–बंगाली समाजातील आहेत. तर अन्य ५ जागांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे २, काँग्रेसचा १ आणि अपक्ष १ असे चार नगरसेवक मराठी समाजाचे असून, साई पक्षाचा १ नगरसेवक सिंधी समाजाचा आहे.

Comments
Add Comment