Monday, January 19, 2026

प्रजासत्ताक दिनी मेट्रो २ बी आणि मेट्रो ९ सेवेत येणार

प्रजासत्ताक दिनी मेट्रो २ बी आणि मेट्रो ९ सेवेत येणार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर रखडलेले मेट्रो प्रकल्प पुन्हा मार्गी लागले असून, मंडाळे ते डायमंड गार्डन मेट्रो २ बी आणि दहिसर पूर्व ते काशीगाव असा मेट्रो ९ चा पहिला टप्पा अशा या महत्त्वाच्या मार्गिका लवकरच प्रवाशांच्या सेवेत सुरू होणार आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजेच २६जानेवारीला मुंबईकरांना ही खास भेट मिळू शकते.

गेल्या काही महिन्यांपासून महापालिका निवडणुका पूर्ण झाल्यानंतर मेट्रो २बी आणि मेट्रो ९ सुरू केल्या जातील, असे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सांगण्यात येत होते. मंडाळे ते डायमंड गार्डन जोडणारी मेट्रो२ बी आणि दहिसर ते काशिगाव जोडणारी मेट्रो ९ या मार्गिकांचे उद्घाटन डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

आता महापालिकेच्या निवडणुका पार पडल्याने मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे. दहिसर ते सुभाष चंद्र बोस स्टेडियम जोडणाऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, हा टप्पा २६ जानेवारी रोजी प्रवाशांसाठी सुरू होण्याची दाट शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. डिसेंबर महिन्यात या मेट्रो मार्गिकेची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. चाचणीदरम्यान आढळलेल्या काही त्रुटींवर एमएमआरडीएला सूचना देण्यात आल्या होत्या. त्या त्रुटी दूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, आता केवळ सीएमआरएस कडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. येत्या आठवड्यात हे प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता असून, त्यानंतर ४.४ किमी लांबीचा टप्पा सुरू केला जाईल.

मेट्रो लाईन ९ ची एकूण लांबी १३.५ किमी आहे. सध्या या मार्गिकेचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशीगाव अशी चार स्थानके असतील. मेट्रो ९ आणि मेट्रो ७ ए पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ पासून थेट मिरा-भाईंदरपर्यंत अखंड मेट्रो कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान, सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.

Comments
Add Comment