Monday, January 19, 2026

कांदिवली–बोरिवली सहावा ट्रॅक सुरू; महिन्याभराच्या ब्लॉकनंतर पश्चिम रेल्वेने घेतला मोकळा श्वास

कांदिवली–बोरिवली सहावा ट्रॅक सुरू; महिन्याभराच्या ब्लॉकनंतर पश्चिम रेल्वेने घेतला मोकळा श्वास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सततच्या ब्लॉकमुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. कांदिवली ते बोरिवली दरम्यान उभारण्यात आलेल्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून १९ जानेवारीपासून या मार्गावर नियमित वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात निर्माण झालेला गोंधळ हळूहळू संपुष्टात येत आहे.

डिसेंबरच्या उत्तरार्धापासून जानेवारीच्या मध्यापर्यंत सुरू असलेल्या पायाभूत कामांमुळे या विभागात मोठ्या प्रमाणावर लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. रोजच्या प्रवासात उशीर, प्रचंड गर्दी आणि पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागल्याने प्रवासी त्रस्त होते. सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याने हा ताण आता कमी होण्याची चिन्हे आहेत.

पश्चिम रेल्वेची सहावी मार्गिका मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळयात एक महत्वाचा टप्पा मानली जात आहे. नव्या मार्गामुळे कांदिवली–बोरिवली या अत्यंत वर्दळीच्या पट्ट्यात रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढणार आहे. लांब पल्ल्याच्या आणि एक्सप्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग मिळाल्याने उपनगरिय लोकलवरील दबाव कमी होणार असून, लोकल सेवा अधिक वेळेवर चालण्यास मदत होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने या मार्गावर आवश्यक तांत्रिक चाचण्या आणि सुरक्षिततेची प्रक्रिया पूर्ण केली असून मंजुरीनंतरच प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल ते बोरिवली विस्तार योजनेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, याचा फायदा पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांना होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा