नावातील विसंगतीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेत 'आधार' आणि 'अपार' आयडी सक्तीचा केल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. आधार कार्ड आणि दहावी-बारावीच्या गुणपत्रिकेतील नावांमध्ये असलेल्या तफावतीमुळे नाव नोंदणीत तांत्रिक अडचणी येत असून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने यंदापासून आधार पडताळणी अनिवार्य केली आहे. गुणपत्रिकेवरील नाव आणि आधारवरील नाव (स्पेलिंगसह) तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. नावाच्या स्पेलिंगमध्ये किरकोळ फरक, आडनाव किंवा मधल्या नावातील विसंगती आढळल्यास अर्ज नाकारले जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संधीला मुकावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
अनेक विद्यार्थ्यांच्या नावातील चुका या प्रशासकीय किंवा तांत्रिक त्रुटींमुळे झाल्या आहेत. आधार कार्ड दुरुस्त करण्यासाठी जन्म दाखल्याची आवश्यकता असते, मात्र ही प्रक्रिया अत्यंत संथ असल्याने नोंदणीच्या अंतिम मुदतीपूर्वी दुरुस्ती करणे अशक्य झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
अंतिम टप्प्यावर कागदपत्र पडताळणी केली जाते. मात्र सीईटी कक्षाने या नियमाबाबत अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता व्यक्त आहे. सीईटी कक्षाने तातडीने धोरणात्मक स्पष्टता करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. प्रतिज्ञापत्र, हमीपत्र, किंवा स्वतंत्र दुरुस्ती कालावधी उपलब्ध करून दिल्यास अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकतो, अशी भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे परीक्षेची संधी देण्याबाबत विचार करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली जात आहे.
"जेईई सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये नावातील किरकोळ विसंगती असतानाही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची मुभा दिली जाते. मग राज्य सीईटी कक्ष असा कठोर नियम का लावत आहे?" असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. नोंदणीची मुदत संपत आली असताना, प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.






