सात दिवसाआड पाणीपुरवठा; टंचाईमुळे जनतेत संताप
अलिबाग : शहापाडा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरावर तीन दिवसाआड येणारे पिण्याचे पाणी आता सात दिवसाआड पाणीपुरवठा सोडण्यात येणार असल्याने पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली आहे. शहापाडा ग्रामीण पाणीपुरवठा अंतर्गत समाविष्ठ गाव-परिसरांत जी “पाणीटंचाई” दाखवली जात आहे, ती वास्तवात नैसर्गिक किंवा तांत्रिक नसून, मानवनिर्मित व कृत्रिम आहे, ही वस्तुस्थिती पाहणाऱ्या या विषयात भाग घेतलेल्या प्रत्येकाला स्पष्ट दिसत आहे. खारेपाटातील पाणीटंचाई व तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा नियमित होऊन नागरिकांना दररोज पाणीपुरवठा व्हावा म्हणून हेटवणे धरण ते शहापाडा धरण वाढीव उद्भव पाणीपुरवठा योजना सुमारे २९ कोटी ३८ लाख रुपये खर्च करून राबवली गेली होती.
अधिकृतरीत्या सांगितले जाते की, या योजनेचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे, पण प्रत्यक्षात तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा सुधारण्याऐवजी तो सात दिवसाआड करण्यात आला आहे. ही परिस्थिती योजनेच्या अपयशाची आहे आणि पाण्याच्या विषयावर गेली ३५-४० वर्ष केल्या जाणाऱ्या राजकारणाची साक्ष असल्याचा आरोप होत आहे.
हेटवणे धरण ते शहापाडा वाढीव उद्भव पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून दरदिवशी सहा एमएलडी पाणी शहापाड्याला पोहते, तरीही शहापाडा धरणात पाणीसाठा कमी का झाला असा सवाल महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाला पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेने विचारला आहे. दरम्यान, शहापाडा ग्रामीण पाणीपुरवठा, रायगड जिल्हा परिषद, उपविभाग- पेण यांनी १२ जानेवारी २०२६ रोजी सर्व संबंधित ग्रामपंचायतींना निर्गमित केलेल्या अधिकृत पत्रात "शहापाडा प्रादेशिक धरणातील पाणीसाठा अल्प असल्याने सात दिवस आड पाणी पुरवठा" असा स्पष्ट दावा करण्यात आलेला आहे. या पत्राद्वारे वडखळ, वाशी, शिर्की, खारेपाट व परिसरातील अनेक गावांवर गुंतागुंतीचे, रात्री-अपरात्री पाणी वाटपाचे वेळापत्रक लादण्यात आलेले असून, वीज खंडित झाल्यास वेळ पुढे ढकलला जाईल आणि ग्रामस्थांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पाणी ही जीवनावश्यक बाब असताना, उपलब्ध पाण्याची वस्तुनिष्ठ आकडेवारी पाहता, असा सात दिवसाआड पाणीपुरवठा सोडण्याचा निर्णय प्रथमदर्शनी अन्यायकारक, विसंगत आणि संशयास्पद वाटतो. कागदावर दाखविलेली टंचाई आणि प्रत्यक्ष उपलब्ध पाण्याचे आकडे यामध्ये मोठी दरी दिसून येत असून, ही परिस्थिती नैसर्गिक नसून, मानवनिर्मित आहे काय, असा गंभीर प्रश्न स्थानिकांना उपस्थित केला आहे. साधारणतः मार्च अखेरपर्यंत पुरणारा शहापाडा धरणाचा पाणीसाठा आज जानेवारी महिन्यातच संपत असल्याचा दावा केला जात आहे. पाण्याचा वापर अचानक वाढला का, गळती वाढली का, नियोजन चुकले का, की पाणी अन्यत्र वळवले गेले आहे, याचा सखोल आणि पारदर्शक खुलासा होणे अत्यावश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
परिसराला दररोज व सुरळीत पाणीपुरवठा तात्काळ सुरू न केल्यास वाशी-शिर्की खारेपाट संबंधित ग्रामस्थ व नागरिक संघटनेमार्फत एकत्रितपणे, कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल.
-प्रकाश माळी, (अध्यक्ष, खारेपाट विकास संकल्प संघटना)
हेटवणे धरणातून कालव्याचे काम चालू आहे. काम सुरू करण्याच्या आधी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था केली असती, तर ही वेळ आली नसती, तसेच हेटवणे धरणातून येणारी पाईप लाईनला पुरेसा पाणी मिळत नाही. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाई संदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. मंजुरी मिळून वर्कऑर्डर निघाली की, तातडीने दहा दिवसात काम सुरु करून तीन दिवसाआड पाणी सुरु करण्यात येणार आहे.
-सेफाली देशमुख, (ग्रामीण पाणी पुरवठा)