मुबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महिलांनी बाजी मारल्याचे दिसून येत असून या निवडणुकीत तब्बल १३० महिला नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत केवळ पुरुष नगरसेवकांची संख्या ९७ एवढी आहे. मात्र, मागील महापालिका निवडणुकीत महिला नगरसेवकांची संख्या ही १३३ होती.त्यामुळे महिला नगरसेवकांची संख्या वाढली असली तरी मागील निवडणुकीतील संख्येपेक्षा तीनने कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे महापालिकेत पुन्हा एकदा महिलांचाच आवाज घुमणार असून अनुभवी महिला आणि नव्याने निवडून आलेल्या महिला नगरसेवक या आपल्या अभ्यासू आणि विविध विषयांच्या माध्यमातून सभागृह आणि वैधानिकसह विशेष समित्यांमध्ये कशाप्रकारे चमक दाखवून प्रभागांसह मुंबईच्या विकासासाठी प्रयत्न करतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण जाहीर झाल्याने महिलांकरता ११४ महिलांकरता प्रभाग राखीव होते. त्यामुळे महापालिकेतील ११४ जागांवर महिला नगरसेवकांना उमेदवारी मिळून त्याठिकाणाहून महिला नगरसेवक निवडून येणे अपेक्षित असते. त्यामुळे महापालिकेत २२७ पैंकी ११४ नगरसेवक हे महिला निवडून येतातच. परंतु काही खुल्या प्रवर्गातूनही महिलांनी निवडणूक लढवल्यामुळे ११४च्या तुलनेत महिला नगरसेवक निवडून येण्याची संख्या १३० एवढी झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी घेतलेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. भाजपचे तब्बल ८९ नगरसेवक तर शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले. महापालिकेत २५ वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या उबाठाचे ६५ नगरसेवक आणि मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. त्याखालोखाल एआयएमआयएम पक्षाचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, या २२७ नगरसेवकांमध्ये महिला नगरसेवकांची संख्या १३० एवढी आहे. तर मागील सन २०१७च्या निवडणुकीत महापालिकेत निवडून आलेल्या महिला नगरसेवकांची संख्या १३३ एवढी होती.
यावेळी निवडून आलेल्या महिला नगरसेवकांची संख्या भाजपमध्ये सर्वाधिक आहे. भाजपचे निवडून आलेलया ८९ नगरसेवकांपैंकी ४९ महिला नगरसेवक आहेत. तर उबाठाचे ३८ महिला नगरसेवक निवडून आले आहेत. उबाठाच्या निवडून आलेल्या ६५ नगरसेवकांपैंकी ३८ महिला नगरसेवकांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या २९ नगरसेवकांपैंकी १९ नगरसेवक या महिला आहेत. तर काँग्रेसच्या २४ पैंकी ११ महिला नगरसेवक, एआयएमआयएमच्या ८ पैकी ५, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा पैंकी पाच अशाप्रकारे महिला नगरसेवक निवडून आलेले आहेत.
सन २०२६ : महिला नगरसेवक १३०, पुरुष नगरसेवक : ९७
सन २०१७ : महिला नगरसेवक १३३, पुरुष नगरसेवक : ९४
सन २०१२ : महिला नगरसेवक १२१, पुरुष नगरसेवक : १०६
सन २००२ : महिला नगरसेवक ८९, पुरुष नगरसेवक : १३८