इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील निर्णायक तिसरा सामना खेळवला जात होता. या सामन्यात न्यूझीलंडने ३३७ धावांचा टप्पा पार करत भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात यश मिळवले आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी शतके केली.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. पण न्यूझीलंडने सलामीवीरांच्या विकेट्स झटपट गमावल्या. पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगने हेन्री निकोल्सला शून्यावर बाद केले. तसेच दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेवॉन कॉनवेला हर्षित राणाने ५ धावांवर माघारी धाडले. पण नंतर डॅरिल मिशेल आणि विल यंग यांनी डाव सावरताना ५३ धावांची भागीदारी केली. पण खेळपट्टीवर स्थिरावलेल्या विल यंगला ४१ चेंडूत ३० धावांवर असताना १३ व्या षटकात हर्षित राणाने बाद केले. त्याचा अफलातून झेल रवींद्र जडेजाने घेतला.
मात्र यानंतर मिशेलने ग्लेन फिलिप्सला साथीला घेतले. या दोघांनी खराब चेंडूंचा समाचार घेत पाहाता पाहाता द्वीशतकी भागीदारी केली. या दोघांनीही शतके साजरी केली. मिशेलन ३६ व्या षटकात १०६ चेंडूत त्याचे शतक झळकावले. हे त्याचे नववे वनडे शतक आहे, तर भारताविरूद्धचे चौथे शतक आहे. याशिवाय चालू मालिकेतील सलग दुसरे शतक आहे. त्याच्यापाठोपाठ ४२ व्या षटकात फिलिप्सनेही ८३ चेंडूत शतक केले. पण शतकानंतर अखेर फिलिप्सला ४४ व्या षटकात अर्शदीप सिंगने बाद केले. त्याचा झेल यष्टीरक्षक के.एल राहुलने घेतला. त्याने ८८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह १०६ धावांची खेळी केली. तो बाद झाल्याने त्याची मिशेल सोबतची २१९ धावांची भागीदारी तोडली. तो बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. ४५ व्या षटकात मिशेलला मोहम्मद सिराजने बाद केल. मिशेलने १३१ चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांसह १३७ धावा केल्या. त्यानंतर मिचेल हे यालाही कुलदीप यादवने २ धावांवर पायचीत केले. तर झाकरी फोक्सने ८ चेंडूत १० धावा केल्या.
४९ व्या षटकात ख्रिनस्टन क्लार्कही ११ धावांवर हर्षित राण्याच्या गोलंदाजीवर त्रिफळाची झाला. पण मायकल ब्रेसवेलने शेवटच्या दोन षटकात आक्रमक खेळताना १८ चेंडूत नाबाद २८ धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडने ५० षटकात ८ बाद ३३७ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा करत भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य पार करावे लागणार होते.