मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश करण्यासाठी अनेकांची पक्षाकडे लॉबिंग
भाजपला चार आणि उबाठाच्या तीन जणांची वर्णी
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणुकीची प्रक्रिया पार पडून नगरसेवकांची निवड झाल्यानंतर आता ज्यांना पक्षाने तिकीट नाकारली असे पक्षाचे पदाधिकारी आता मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश करणार आहेत. तसेच निवडणुकीत ज्यांनी चांगली कामे केली अशांना पक्षाच्यावतीने महापालिकेत नामनिर्देशित सदस्य म्हणून पाठवले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेतील नामनिर्देशित सदस्यपदी आपली वर्णी लागावी, यासाठी प्रत्येक पक्षातील पदाधिकाऱ्यांची पक्षप्रमुखांकडे किंवा मुंबई अध्यक्षांकडे लॉबींग सुरु होणार आहे. मुंबईत यापूर्वी पाच नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली जात असली तरी यापुढे ही संख्या दुप्पट केल्याने प्रत्येक पक्षाच्या वाट्याला जाणाऱ्या पदांमध्येही वाढ होणार असल्याने यंदा दहा सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपल्या कोट्यातून एका पदाधिकाऱ्याची किंवा प्रतिष्ठीत व्यक्तीची महापालिकेत नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करता येणार आहे.
मुंबई महापालिकेत सन २०१७ च्या निवडणुकीनंतर भाजपच्यावतीने गणेश खणकर, श्रीनिवास त्रिपाठी, काँग्रेसच्यावतीने सुनील नरसाळे, तत्कालिन शिवसेनेच्यावतीने अरविंद भोसले आणि तृष्णा विश्वासराव यांनी नामनिर्देशित महापालिका सदस्य तथा नगरसेवक, नगरसेविकापदी नियुक्ती केली होती. परंतु यापूर्वी पाच नामनिर्देशित नगरसेवकांच्या तुलनेत आता दहा नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. प्रत्येक पक्षाच्या एकूण नगरसेवक संख्येच्या आधारे अर्थात गणसंख्येनुसार नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे भाजपचे एकूण ८९ नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांच्यावतीने ४ व्यक्तींची नियुक्ती नामनिर्देशित नगरसेवक म्हणून केली जाण्याची शक्यता आहे, तर उबाठाचे ६५ आणि मनसेचे ६ याप्रमाणे ७१ नगरसेवक असल्याने किमान तीन सदस्य उबाठाच्यावतीने सभागृहात पाठवले जावू शकतात. शिवसेना आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक एक जागा जावू शकते अशाप्रकारचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना, उबाठा आणि काँग्रेसच्यावतीने महापालिका सभागृहात नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त केले जाणार असल्याने प्रत्येक पक्षाचे प्रमुख आणि अध्यक्ष यांच्याकडे आतापासूनच लॉबिंग होत असल्याचे ऐकायला मिळत आहे.
सभागृहात बसणार कुठे?
मुंबई महापालिकेची सदस्य संख्या २२७ वरून २३६ करण्याचा प्रयत्न ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला; परंतु, पुढे प्रभागांची संख्या वाढवण्याचा हा निर्णय रद्द करून प्रभागांची संख्या २२७ एवढी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र २३६ प्रभाग संख्या वाढवल्यानंतर सदस्यांना सभागृहात बसण्यासाठी जागा नसून २३६ अधिक पाच नामनिर्देशित अशाप्रकारे २४१ महापालिका सदस्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडणार असल्याची चिंता यापूर्वीपासून व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर २२७ आणि दहा नामनिर्देशित सदस्य याप्रकारे आता २३७ एवढी सदस्य संख्या होणार असल्याने सभागृहात तेवढी आसन क्षमताही नाही, याची पूर्ण कल्पना असूनही महापालिका प्रशासनाच्यावतीने सभागृहाचे क्षेत्रफळ वाढवण्याच्या दृष्टीकोनातून कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली नाही. परिणामी आता महापालिका सभागृहात पाच नामनिर्देशित सदस्य वाढवण्यात येणार असल्याने त्यांच्यासाठी आता अधिक जागा राखीव निर्माण करतानाच महापालिका सचिव आणि महापालिकेच्या कामांचे वृत्तांकन करणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आपल्या जागा गमावण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सभागृहाची आसन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न मागील प्रशासकांच्या कालावधीमध्ये न झाल्याने याचा परिणाम महापालिकेत निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या आसन व्यवस्थेवर होणार आहे. यासर्व नगरसेवकांना दाटीवाटीने बसून महापालिकेच्या कामांमध्ये भाग घ्यावा लागणार आहे.






