रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत राज्यातील आणि मुंबई महानगरपालिकेतील निवडणूक निकालांवर सविस्तर भूमिका मांडली. उठावानंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास व्यक्त केला असल्याचे त्यांनी सांगितले.
उदय सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सव्वाचारशेहून अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. महाराष्ट्राने शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले असून मी मतदारांचे आभार मानतो. जिथे अपेक्षित यश मिळाले नाही, तिथे आत्मपरीक्षण करून चुका दुरुस्त केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिकेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुंबईत जे वातावरण तयार करण्यात आले होते, मुंबईकर नुसते भाषणावर, भाषणातील आश्वसनांना झुगारून मुंबईकरांनी विकासाला मतदान करून उत्तर दिले आहे. मुंबईकरांनी महायुतीवर विश्वास टाकला आहे
उबाठावर टीकेचे झोड
उबाठा गटावर टीका करत, उबाठाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली, त्यामुळे त्यांना कुठेही सत्ता मिळालेली नाही आणि जनतेकडून स्वीकार मिळालेला नाही, असे सामंत म्हणाले. आकड्यांबाबतही ते खोटे चित्र रंगवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
महापौर कोणाचा असेल?
महापौर पदाबाबत बोलताना उदय सामंत यांनी सांगितले की, महापौर कोण होणार याचा निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेतील. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच महापौर निवडीची प्रक्रिया होईल आणि महायुतीचाच महापौर होणार, याबाबत त्यांनी ठाम भूमिका मांडली.
मनसे आणि राज ठाकरे याबाबत काय म्हणाले ?
मनसे आणि राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या निवडणुकीत सर्वाधिक फटका मनसेला बसेल, हे आधीच स्पष्ट होते. मनसेच्या मतांमध्ये घट झाली असून उबाठाच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. मनसेच्या मतांच्या फरकाचा फायदा उबाठाने घेतल्याचे त्यांनी नमूद केले. राज ठाकरे यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले असून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर त्यांना भावनिक पातळीवर खेचण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.
मतदानाचा टक्का
राज्यात सर्वत्र मतदानाचा टक्का वाढलेला असून काही ठिकाणी राजकीय भूमिका मतदारांसमोर स्पष्ट झाल्याचे सामंत म्हणाले. कोणाला मतदान करायचे, हा लोकशाहीचा अधिकार असून त्यात हस्तक्षेप करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीनंतर आनंद साजरा करावा, मात्र तो कुणाला दुखावणारा नसावा, हे तत्व आपण पाळतो, असेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना त्यांनी सांगली आणि इतर भागांतील निकालांवरही भाष्य केले. सांगलीत महापौर कोण होणार हे आम्ही ठरवू, त्यामुळे आमची ताकद स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात शिवसेना-भाजप युती म्हणून निवडणूक लढवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादीसोबत युतीबाबत चर्चा झाली असली तरी पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.