Saturday, January 17, 2026

कल्याण–डोंबिवलीत महापौरपदावर प्रश्नचिन्ह

कल्याण–डोंबिवलीत महापौरपदावर प्रश्नचिन्ह

शिवसेनेची अनपेक्षित मुसंडी

कल्याण : कडोंमपा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, महापौरपद भाजपच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांत भाजप आघाडीवर होते. पुढे निकालाचा कल बदलला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अनपेक्षित मुसंडी मारली. कल्याण–डोंबिवली महापालिकेच्या १२२ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सुरुवातीला भाजप एकहाती सत्ता मिळवेल, असे संकेत होते. शिंदे गटाची ताकद असूनही सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्या जागा अपेक्षेप्रमाणे वाढत नसल्याने त्यांच्या गोटात अस्वस्थता होती. सध्याच्या निकालानुसार शिवसेना (शिंदे गट) ने ५२ जागांवर विजय मिळवला, भाजप ४८ जागांवर थांबला असून अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या. उबाठाला १०, मनसेला ५, काँग्रेसला २ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला १ जागा मिळाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी ६१ हा जादुई आकडा आवश्यक आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजप मागे पडताना, शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारल्याने महापौरपदावर कोणाचा दावा असणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रभाग २१ मधील तीनही जागांवर म्हात्रे

कुटुंबीयांनी विजय मिळवला :

अ- प्रवर्ग (नागरिकांचा मागास प्रवर्ग): मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांनी भाजपचे उमेदवार प्रदीप जोशी यांचा पराभव केला. प्रल्हाद म्हात्रे यांना ९ हजार ९०८ मते मिळाली.

ब- प्रवर्ग (सर्वसाधारण महिला): भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या रविना म्हात्रे विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या सुजाता परब यांचा पराभव करत ८,५८५ मते मिळवली.

क- प्रवर्ग (सर्वसाधारण महिला): शिवसेनेच्या (शिंदे गट) रेखा म्हात्रे यांनी ठाकरे गटाच्या अर्चना पाटील यांचा पराभव केला. रेखा म्हात्रे यांना १०,८६१ मते मिळाली.

२१ जागांवर महायुतीचे नगरसेवक बिनविरोध :

भाजपचे १५ आणि शिवसेना ६ मिळून २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापैकी १९ बिनविरोध. भाजपच्या रंजना पेणकर, आसावरी नवरे, मंदा पाटील, ज्योती पाटील, रेखा चौधरी, मुकंद तथा विशू पेडणेकर, महेश पाटील, साई शेलार, दिपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, हर्षदा भोईर, डॉ. सुनिता पाटील, पूजा म्हात्रे, रविना माळी, मंदार हळबे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

Comments
Add Comment