८२५ नव्हे, तर १५४७ दिवस होता अव्वल स्थानी
मुंबई : विराट कोहलीने आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत चार वर्षांनंतर अव्वल स्थान पटकावले. पण, आयसीसीने याची घोषणा करताना एक मोठी चूक केली होती आणि चाहत्यांनी ती लक्षात आणून दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला त्यात सुधारणा करावी लागली. भारत-न्यूझीलंड पहिल्या वन डे सामन्यात विराटने ९३ धावांची खेळी केली होती आणि जुलै २०२१ नंतर वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. आयसीसीने जाहीर केलेल्या या बातमीत सर्वाधिक काळ वन डे फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर राहणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट ८२५ दिवसांसह दहाव्या क्रमांकावर होता.
पण, आयसीसीने ती चूक सुधारली आणि कोहली ८२५ दिवस नव्हे तर १५४७ दिवस वन डे फलंदाजांच्या अव्वल क्रमांकावर विराजमान असल्याचे जाहीर केले. त्यामुळे तो सर्वाधिक काळ अव्वल राहिलेल्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या विक्रमात वेस्ट इंडिजचे दिग्गज ब्रायन लारा (२०७९) व व्हीव्ह रिचर्ड्स (२३०६) हे विराटच्या पुढे आहेत. १,५४७ दिवसांच्या सुधारणेसह कोहलीने अनेक समकालीन महान खेळाडूंना मागे टाकले आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये, कोहलीने पहिल्यांदाच अव्वल क्रमांक मिळवला आणि त्यानंतर त्याने दहा वेळा तो पुन्हा मिळवला आहे. ज्यामुळे वन डे क्रिकेटमधील प्रमुख फलंदाजांपैकी एक म्हणून त्याची दीर्घकालीन प्रतिष्ठा आणखी मजबूत झाली आहे.
विराटचे अव्वल स्थान संकटात
आयसीसीने १४ जानेवारील वन डे क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली आणि कोहली हिटमॅन रोहितला मागे सोडून नंबर वन फलंदाज बनला. रोहितची तिसऱ्या स्थानी घसरण झाली, तर न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल दुसऱ्या क्रमांकावर आला. आता विराट व मिचेल यांच्यात फक्त (७८५-७८४) एका गुणाचा फरक आहे, तर रोहित ७७५ रेटिंग पॉइंटसह तिसरा आहे. पण कोहलीचे अव्वल स्थान संकटात आले आहेत. कारण मिचेल व रोहित यांच्या आणि विराटच्या गुणांत फार फरक नाही. विराट दुसऱ्या सामन्यात २३ धावांवर बाद झाला आणि रोहितलाही २४ धावा करता आल्या. पण, मिचेलने सातत्य राखताना आणखी एक अर्धशतकीय खेळी केली. त्यामुळे आता ताजी क्रमवारी जाहीर झाल्यास मिचेल वन डे क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज बनले.