ढग कसे चमकतात?

कथा ,प्रा. देवबा पाटील


नेहमीप्रमाणे संध्याकाळी आपला शाळेचा गृहपाठ व अभ्यास आटोपल्यावर सीता व नीता मावशीजवळ आल्या. “का गं, आज थोडा वेळच लागला तुम्हाला गृहपाठ व अभ्यास पूर्ण करायला?” मावशीने विचारले.
“हो मावशी, आज जरा जास्तीचा गृहपाठ दिला होता सरांनी.” सीता म्हणाली.
“आणि अभ्यासही थोडा शिकवायला सांगितला होता.” नीतानेही सांगितले.
“चला गच्चीवर.” मावशी त्यांच्याकडे बघत म्हणाली, “आज स्वयंपाकाला थोडासा उशीरच आहे असे आईने आधीच मला सांगितले आहे.”



ते ऐकून दोघींनाही खूपच आनंद झाला. कारण त्यांना वाटले होते की, आज आपणास अभ्यासाला वेळ लागला म्हणून कदाचित मावशी गच्चीवर यायला नाही म्हणेल, पण त्यांचा अंदाज चुकला व मावशीने स्वत:हून गच्चीवर चलण्याविषयी म्हटले. त्यांनी आनंदाने पटकन सतरंजी आणली व मावशीच्या मागे गच्चीवर निघाल्या. अशा त्या तिघी मायलेकी संध्याकाळच्या वेळी गच्चीवर गेल्या. संध्याकाळची गार हवेची झुळुक वातावरणाला आनंद देऊन गेली. मावशी शहरात राहणारी असल्याने गच्चीवर उभे राहून आकाशातील ढगांचे सौंदर्य बघू लागली, गच्चीवर थोडे इकडून तिकडे, तिकडून इकडे फिरत गच्चीवरून दिसणारे जवळच्या शेतातील पिकांचे, झाडाझुडपांचे सौंदर्य पाहू लागली. मुलीसुद्धा मावशीसोबत निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेऊ लागल्या.



“मुलींनो तुम्ही दुपारच्या सूर्याला कधी बघितले का नाही?” मावशीने सहज प्रश्न केला.
“नाही मावशी.” दोघीही म्हणाल्या.
“आपण तर दिवसा सूर्याकडे बघूच शकत नाही न् मावशी.” नीता म्हणाली.
“मावशी! दुपारी आपण सूर्याकडे का बघू शकत नाही?” सीता म्हणाली.
“दुपारच्या वेळी सूर्य हा आपल्या डोक्यावर असताना सूर्यकिरणे ही आपणाकडे सरळ रेषेत येतात व त्यांचा मार्गसुद्धा कमी लांबीचा असतो. सूर्य हा तेज:पूंज प्रकाशगोळा असल्याने या सूर्यकिरणांचे तेजसुद्धा खूप जास्त असते. त्यामुळे एवढा तेजस्वी प्रकाश आपले डोळे सहन करू शकत नाहीत आणि आपले डोळे एकदम दीपतात व आपोआप मिटतात, म्हणून आपण दुपारच्या वेळी सूर्याकडे बघू शकत नाही. तसेच या दुपारच्या वेळी सूर्यकिरणे पृथ्वीवर सरळ पडत असल्याने त्यांची उष्णता पृथ्वीकडे जास्त संक्रमित होते म्हणून पृथ्वी दुपारी जास्त तापते.” मावशीने स्पष्टीकरण दिले.



“मावशी काही काळ्या ढगांच्या कडा पांढ­ऱ्या शुभ्र कशा काय दिसतात?” सीताने प्रश्न केला.
“हो मावशी त्या कडा चांदीसारख्या चमचम का चमकतात?” नीतानेही शंका उकरली.
“अशा जाड, दाट व काळ्याशार ढगांच्या कडा पातळ असल्यास मात्र त्या कडांमधून सूर्यप्रकाश आरपार गेल्यामुळे त्या पांढ­ऱ्याशुभ्र दिसतात तसेच त्या कडांतील थेंबांवरून सूर्यप्रकाशाचे संपूर्ण विकीरण झाल्यामुळे त्या प्रखर तेजाने चमकतात. अशा चमकदार शुभ्र कडा असलेल्या काळ्या ढगास “रूपेरी किनार किंवा चंदेरी किनार चढली” असे म्हणतात.” मावशीने खुलासा केला.



“आणि मावशी काही ढग तर रंगीतही दिसतात.” नीता उत्साहाने बोलली.
“पांढ­ऱ्या ढगांतील थेंबांवरून जर निळ्या, जांभळ्या, हिरव्या, पिवळ्या, तांबड्या रंगाचे विकीरण जास्त झाले, तर ते ढग तसतसे त्या-त्या रंगांनुसार छानसे रंगीत दिसतात. जर एकाच ढगातील वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या थेंबांवरून एकाच वेळी वेगवेगळ्या रंगाच्या किरणांचे विकिरण जास्त झाल्यास ते ढग बहुरंगी दिसतात,” मावशीने सांगितले.
“काही वेळा ढगात चमकदार तेजस्वी पट्टे कसे दिसतात?” सीताने विचारले.
“सूर्यकिरण काळ्या ढगातील पाण्याच्या थेंबांमध्ये शोषले गेल्याने ते पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाहीत; परंतु कधी-कधी ढगात पाण्याच्या थेंबांचे बर्फाच्या स्फटिकात रूपांतर झालेले असते. त्यातून ब­ऱ्याच प्रमाणात प्रकाश जातो. अशा ढगात कधी-कधी तेजस्वी चमकदार पट्टे दिसतात.” मावशीने
उत्तर दिले.
रोजच्यासारखा सायंकाळच्या सूर्याने आपला मावळतीचा प्रवास सुरू केल्याने मावशीने आपला विज्ञानदायक गोष्टींचा पसारा आवरता घेतला. त्यांनी सतरंजीची घडी केली व मावशीसोबत त्या दोघीही खाली आल्या.

Comments
Add Comment

इच्छेला प्रयत्नांची जोड हवीच

शिल्पा अष्टमकर: गोष्ट लहान, अर्थ महान माणसाच्या जीवनात इच्छा असणे ही पहिली पायरी आहे, पण केवळ इच्छा असून चालत

संस्कारक्षम मन

प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ शाळेचे अनेक उपक्रम असतात. अशाच एका उपक्रमात शाळेतल्या विद्यार्थ्यांना

चिंगी मुंगी...

कथा: रमेश तांबे एक होती मुंगी नाव तिचं चिंगी एकदा काय झालं चिंगी खूपच दमली पळून पळून खरेच थकली मग तिने

सायंकाळी आकाश रंगीबेरंगी कसे दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील  रोजच्याप्रमाणे सीता व नीता सायंकाळी या शाळेतून घरी आल्या. आपला गृहपाठ आटोपून मावशीला

विशाल मुंबई शिक्षण प्रसारक मंडळाचे आदर्श विद्यालय

दि विशाल मुंबई शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली. भाऊ राणे, लक्ष्मण आर. प्रभू, विश्वनाथ

सुषमा पाटील विद्यालय व ज्युनियर, सीनिअर (नाईट) कॉलेज (कामोठे)

कै. बाळाराम धर्मा पाटील शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना जून २००५ मध्ये करण्यात आली. कामोठे वसाहतीतील व ग्रामीण