विराट कोहलीचा विक्रम मोडला
मुंबई : ३९ वर्षीय डेव्हिड वॉर्नरने बिग बॅश लीगमध्ये पुन्हा धावांचा पाऊस पाडला. सिडनी थंडर्स संघाकडून खेळणाऱ्या वॉर्नरने बीबीएलच्या या पर्वातील दुसरे शतक झळकावले. सिडनी डर्बीमध्ये वॉर्नरने सिडनी सिक्सर्स संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने ६५ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह ११० धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला ६ बाद १८९ धावांपर्यंत पोहोचवले. वॉर्नरने या शतकासह भारताचा स्टार विराट कोहली याचा विक्रम मोडला. टी-२० मध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत वॉर्नरने आगेकूच केली आहे.
थंडर्सकडून वॉर्नर वगळल्यास अन्य फलंदाजांनी पाट्या टाकल्या, मिचेल स्टार्सने सिक्सर्सला पहिले यश मिळवून देताना सलामीवीर मॅथ्यू गिल्केसला ( १२) बाद केले. त्यानंतर जॅक एडवर्ड्स, बेन मानेंटी यांनी विकेट घेतल्या. सॅम कुरनने २८ धावा देताना ३ बळी टिपले. हे गोलंदाज मैदान गाजवत असताना वॉर्नर उभा राहिला आणि त्याने सर्वांचा समाचार घेतला. तो पहिल्या षटकापासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत नाबाद राहिला. त्याने ६५ चेंडूंत ११० धावा केल्या.
यंदाच्या बीबीएलमधील हे त्याचे दुसरे शतक ठरले. त्याने २०२६ मध्ये टी-२०त आतापर्यंत ४ सान्यांत ३८९च्या सरासरीने ३९८ धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकं व दोन अर्धशतकं आहेत. आजच्या सामन्यातील शतक हे त्याचे टी-२०तील १०वे शतक ठरले आणि त्याने विराट कोहली व रिली रोसोवू (प्रत्येकी ९ शतकं) यांना मागे टाकले. टी-२०त सर्वाधिक शतकांच्या यादीत वॉर्नरच्या पुढे बाबर आझम (११) व ख्रिस गेल (२२) हे दोनच खेळाडू आहेत.
टी-२०त धावांच्या विक्रमात चौथ्या क्रमाकांवर
डेव्हिड वॉर्नर विविध फ्रँचायझी टी-२० लीगमध्ये खेळत आहे. त्याने आयपीएलमध्येही दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबाद यांचे प्रतिनिधित्व केले. २०१६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली एसआरएचने आयपीएल जिंकली. त्याने आयपीएलमध्ये १८४ सामन्यांत ६५६५ धावा केल्या आहेत. त्यात ४ शतकं व ६२ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय तो मेजर लीग क्रिकेट, पाकिस्तान सुपर लीग, आयएलटी २०, मेन्स १००, बीपीएल, सीपीएल, सीएलटी२०, व्हिटालिटी ब्लास्ट आदी लीगमध्येही खेळला आहे. त्याने एकूण ४३१ टी-२० सामन्यांत ३६.८२ च्या सरासरीने १३९१८ धावा केल्या आहेत. त्यात १० शतकं व ११५ अर्धशतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टी-२०त त्याच्या नावावर ११० सामन्यांत ३२७७ धावा आहेत. त्यात १ शतक व २८ अर्धशतकं आहेत. टी-२०त सर्वाधिक धावांच्या विक्रमात तो चौथ्या क्रमांकावर आहे.