मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर केल्याने कोल्हापूर महापालिकेची ही निवडणूक कमालीची चुरशीची ठरली. मंत्री, आमदार, खासदारांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. पहिल्या टप्प्यातील निकाल हाती येऊ लागले असून अवघ्या तासाभरातच सत्तासमीकरणाचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले.
तब्बल आठ वर्षांनंतर झालेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला २० प्रभागांतील सर्व जागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर महापालिकेत सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरला परंतु बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपला २५ जागा तर शिवसेना शिंदे गटाला १५, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४ असे मिळून महायुती एकूण ४४ जागा तर विनय कोरे यांचा असलेला पक्ष जनसुराज्यला एक जागा मिळाली आहे. सतेज पाटील यांनी एकाकी झूंज दिलेल्या काँग्रेसने ३५ जागांवर मजल मारली. तर ठाकरे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली. सत्ताधारी व विरोधकांमध्ये कडवी लढत पाहायला मिळाली. काही प्रभागांमध्ये अत्यल्प मताधिक्याने निकाल लागला, तर काही ठिकाणी एकतर्फी विजय नोंदवला गेला.
महिला उमेदवारांचा सहभाग आणि यश लक्षणीय ठरले असून अनेक प्रभागांमध्ये महिलांनी बाजी मारली आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. मात्र काही ठिकाणी तणावाचे प्रसंगही घडल्याने पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. २० प्रभागातून एकूण ८१ सदस्य निवडून आले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान चुरस, प्रचारातील आरोप-प्रत्यारोप आणि निकालाकडे लागलेली सर्वांची उत्सुकता अखेर संपली आहे.






