Friday, January 16, 2026

मीरा-भाईंदरमध्ये भाजपची एकहाती सत्ता

मीरा-भाईंदरमध्ये भाजपची एकहाती सत्ता

१८ दिग्गज माजी नगरसेवकाचा पराजय

भाईंदर : भारतीय जनता पक्षाने सन २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीची पुनरावृत्ती करत स्पष्ट बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली आहे. भाजपचे ७८ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात भाजपचे १३ उच्च शिक्षित युवा उमेदवार सुध्दा विजयी झाले आहेत. तर एका माजी महापौरांना मतदारांनी घरी बसवले आहे. तर १८ दिग्गज माजी नगरसेवकांचा पराजय झाला आहे यात शिवसेना, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांचा समावेश आहे.

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीची मतमोजणी सकाळ पासून सुरू झाली होती, अगदी पहिल्याच फेरी पासून भाजपाने आघाडी घेतली होती. सुरवातीला जाहीर झालेल्या ६ पॅनल म्हणजे २४ जागा जिंकून भाजपाने नुसतेच खाते उघडले नाही तर पुढेही विजयाची आघाडी सुरूच ठेवली. आणि अखेर ७८ जागांवर विजय मिळवत मीरा भाईंदर महापालिकेत एक हाती सत्ता काबीज केली आहे.

मीरा भाईंदरमध्ये ८लाख १९ हजार १५१ मतदार होते. आणि मतदान ४८.६४ टक्के झाले होते. भाजपाने ९५ जागांपैकी ८७ जागा लढविल्या होत्या आणि ८ जागा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ला सोडल्या होत्या. आणि ८७ जागांपैकी ७८ जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या महापालिकेत २२ जागा असलेल्या शिवसेनेला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर १२ जागा असलेल्या काँग्रेसची एक जागा वाढून १३ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, उबाठा यांना खाते सुध्दा उघडण्यात यश मिळाले नाही.

  • शिवसेना, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराभूत
  • भाजपचे सर्व उच्चशिक्षित युवा उमेदवार विजयी

जनतेने पुन्हा एकदा विकासाला साथ दिली आहे. आता शहराला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणार. भाजपने विकासाचा मुद्दा मांडला तर इतर पक्ष फक्त मोठमोठ्या गप्पा मारत बसले. - नरेंद्र मेहता, आमदार

पक्षीय बलाबल :

भाजप ७८

काँग्रेस १३

शिवसेना ३

अपक्ष १

Comments
Add Comment