Beatriz Taufenbach : दाक्षिणात्य सिनेमा आजकाल सर्वांचे आवडते झाले आहेत व तसचं रॉकिंग स्टार यशच्या बहुप्रतीक्षित ‘Toxic’ चित्रपटाचा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आणि वाद सुरू झाला आहे. यशच्या वाढदिवसा दिवशी ८ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या टीझरमधील एका दृश्यामुळे चित्रपट अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. खास म्हणजे स्मशानभूमीत चित्रीत करण्यात आलेला एक सीन प्रेक्षकांच्या आणि सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आला आहे.
टीझरमध्ये यशसोबत ब्राझलीयन अभिनेत्री Beatriz Taufenbach हिच्यावर चित्रित करण्यात आलेला सीन अनेकांना नैतिकदृष्ट्या आक्षेपार्ह वाटत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या दृश्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. काही युजर्सनी हा सीन अनावश्यक असल्याचे म्हटले, तर काहींनी चित्रपटाच्या कथानकासाठी तो आवश्यक असल्याचे समर्थन केले. या संपूर्ण प्रकरणानंतर अभिनेत्री Beatriz Taufenbach हिने आपले सोशल मीडिया अकाऊंट तात्पुरते डिअॅक्टिवेट केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वाढत्या ट्रोलिंगपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी आणि नकारात्मक कमेंट्सपासून वाचण्यासाठी तिने हा निर्णय घेतला असावा. सध्या तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट असल्याचेही सांगितले जात आहे. या वादाने आता अधिक गंभीर वळण घेतले असून, ‘Toxic’ च्या टीझरविरोधात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडे (CBFC) तक्रार दाखल करण्यात आली आहे. टीझरमधील काही दृश्ये नैतिकतेच्या चौकटीबाहेर असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
गीतू मोहनदास दिग्दर्शित ‘Toxic’ हा यशच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट मानला जात आहे. टीझरमध्ये यशचा डार्क, रॉ आणि इंटेन्स लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतानाच, वादग्रस्त सीनमुळे चित्रपट चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आगामी काळात या वादावर निर्माते आणि सेन्सॉर बोर्ड काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.