तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार
मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असून सुमारे ५५ टक्के एवढे मतदान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मुंबईत मागील महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत ५५.५३ टक्के एवढे मतदान झाले होते. या मतदानाच्या माध्यमातून मुंबईतील १७०० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. शिवसेना आणि मनसेकडून दुबार मतदारांच्या नावावर वातावरण तापवण्याचा प्रकार तसेच बोटावरील शाई पुसली जात असल्याचे सांगत वातावरण गढूळ करण्याचा प्रकार वगळता मुंबईत शांततेत मतदान पार पडले.
निवडणूक मतदानाला सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांमध्ये ६.९८ टक्के एवढे मतदान तब्बल १० हजार २३१ मतदान केंद्रावर पार पडले होते. तर त्यानंतर पुढील दोन तासांमध्ये मतदानाचा टक्का १० टक्क्यांनी वाढला गेला. त्यामुळे सकाळी साडेअकरा वाजता मतदानााच टक्के १७.७३ टक्के एवढे झाले होते. त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानाचा टक्के आणखी वाढून २९.९६ टक्के एवढा झाला होता. तर सायंकाळी साडेतीन वाजता मतदानाची आकडेवारी ४१.०८ टक्क्यांवर पोहोचली होती. तर सायंकाळी साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपली असली तरी वेळ संपण्यापूर्वी मतदान केंद्रात पोहोचलेल्या मतदारांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून टोकन क्रमांक देवून केंद्राच्या आतील बाजुस घेत त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. मात्र, एकूण सकाळपासून सुरु झालेल्या मतदानात मतदारांचा उत्साह मोठ्याप्रमाणात दिसून आला नाही. प्रत्येक मतदान केंद्रांवर दोन ते चा मतदारच दिसून येत होते. त्यामुळे एकाच ठिकाणी असलेल्या चार ते पाच मतदान केंद्रांपैकी केवळ एखाद दुसऱ्या मतदान केंद्रांवर दोन ते चार मतदार दिसून येत होते, तर बाकीच्या मतदार केंद्रांमध्ये शुकशुकाट दिसून येत होता. गोरेगाव पूर्व येथील गोकुळनगरमधील शाळेतील मतदान केंद्रात सकाळी अकराच्या सुमारास फारशी गर्दी दिसून येत होती. तर माटुंगा रोड पूर्व येथील रेल्वे कॉलनीमधील मतदान केंद्रातही अपवादात्मक मतदारांची गर्दी दिसून येत होती . याठिकाणी राजकीय पक्षांच्या टेबलवर गर्दी लक्षणीय दिसून येत होती, पण मतदान केंद्रात गर्दी ऐवजी तुरळक मतदार दिसून येत होते. माटुंगा पश्चिम येथील कस्तुरबा सभागृह, रुपारेल कॉलेज, बालमोहन शाळा तसेच माहिम म्युनिसिपल स्कूलमध्येही एखाद दुसऱ्या केंद्रावरच चार ते पाच मतदार रांगेत उभे असल्याचे दिसून येत होते
पहिल्या गुप्तहेर रजनी पंडित यांनाही बालमोहन शाळेतील आपले मतदान केंद्र शोधण्याची वेळ आली होती. हाती आपले मतदान ओळखपत्र घेत त्या मतदान केंद्राचा शोध घेत होत्या.
दरम्यान, मुंबईतील काही ठिकाणी मतदानासाठी आलेल्या काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र असले तरी मतदार यादीत नावच नसल्याचे आढळून आले. परंतु निवडणूक ऍपवर मात्र नाव आढळून येत होते,अशाप्रकारच्या तक्रारी येत असल्याने काही केंद्रांमध्ये मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे पहायला मिळत होते.
मुंबईतील निवडणुकांमधील मतदानाचा टक्का
- सन : १९९२ : ४९.१४ टक्के
- सन १९९७ : ४४.३६ टक्के
- सन २००२ : ४२.०५ टक्के
- सन २००७ : ४६.०५ टक्के
- सन २०१२ : ४४.५७ टक्के
- सन २०१७ : ५५.२८ टक्के
- सन २०२६ : सुमारे ५५ टक्के