मतदारांचा विकासाला कौल; ठाकरे बंधुंसह पवार काका पुतण्याला दणका
मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीबाबत एक्झिट पोल्सनी वर्तवलेले अंदाज बव्हंशी खरे ठरले असून, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने या निवडणुकांत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल २५ महापालिकांवर महायुतीने सत्ता मिळवत ठाकरे बंधुंसह पवार काका पुतण्याला दणका दिला. विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये भाजप आणि शिवसेनेचा दबदबा ठळकपणे दिसून आला.
राजधानी मुंबई महापालिकेत महायुतीने निर्णायक आघाडी घेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजप ९० जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला असून, शिवसेनेला २८ जागा मिळाल्या आहेत. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या उबाठा गटाला ५७, तर राज ठाकरेंच्या मनसेला ९ जागांवर समाधान मानावे. काँग्रेसला अनपेक्षित १५ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची स्थिती मर्यादित दिसून आली. रस्ते, रेल्वे, मेट्रो, पुनर्विकास, स्वच्छता आणि पाणीपुरवठा यांसारख्या मुद्द्यांवर मुंबईकरांनी विश्वास दाखवला असून, बहुपक्षीय लढतीतही महायुतीने बाजी मारली आहे.
ठाणे महापालिकेत शिवसेनेने ५५ तर भाजपने २५ जागा जिंकत सत्तेवर पकड मजबूत केली आहे. नवी मुंबईत भाजपने ६६ जागा जिंकून स्वबळावर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. या ठिकाणी शिवसेनेला ४२ जागा मिळाल्या. मीरा-भाईंदरमध्ये भाजपने ७४ जागांसह एकहाती सत्ता मिळवली, तर शिवसेना आणि इतर पक्ष पिछाडीवर राहिले. कल्याण-डोंबिवलीत शिवसेना (५१) आणि भाजप (४८) यांनी मिळून महायुतीचा किल्ला अबाधित ठेवला. उल्हासनगरमध्ये भाजप (३८) आणि शिवसेना (३६) यांची सरशी झाली, तर भिवंडी-निजामपूरमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवून पुढे असली तरी सत्ता स्थापनेचा मार्ग त्यांच्यासाठी खडतर दिसून येत आहे.
..................
हितेंद्र ठाकुरांनी गड राखला
पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महापालिकेत मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले. येथे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने ७१ जागा जिंकत सत्ता कायम राखली, तर भाजपला ४३ जागांवर समाधान मानावे लागले. रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेत भाजपने ६० जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधांचा फायदा महायुतीला झाला.
............
नागपुरसह पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सरशी
- पुणे महापालिकेत भाजपने ९० जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले. आयटी हब, मेट्रो, स्मार्ट सिटी आणि वाहतूक व्यवस्थेच्या मुद्द्यांवर पुणेकरांनी भाजपला कौल दिला. याशिवाय पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने ८४ जागा जिंकत मोठा विजय मिळवला असून, नाशिक (७६), छत्रपती संभाजीनगर (५८) आणि नागपूरमध्ये तब्बल १०२ जागा जिंकत भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. नागपूरमध्ये काँग्रेस आणि उबाठा-शरद पवार गट एकत्र असूनही भाजपचा झंझावात त्यांना थांबवता आला नाही.
- एकूणच राज्यातील २९ महापालिकांच्या निकालांमधून शहरी मतदारांनी विकासाभिमुख धोरणे, खंबीर नेतृत्व आणि स्थिर प्रशासनाला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीला मिळालेले हे यश जिल्हा परिषदेसह विधानस परिषदेच्या निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.
...................
कोणत्या पक्षाला किती जागा?
मुंबई – भाजप ९०, शिवसेना २८, उबाठा ५७, मनसे ९, काँग्रेस १५, राष्ट्रवादी अजित पवार ३, शरद पवार १
ठाणे – शिवसेना ५५, भाजप २५, शरद पवार ११, राष्ट्रवादी अजित पवार ८, उबाठा १
नवी मुंबई – भाजप ६६, शिवसेना ४२, उबाठा २, मनसे १
पनवेल – भाजप ६०, शिवसेना २, राष्ट्रवादी २, उबाठा ५, काँग्रेस ४,
मीरा-भाईंदर - भाजप ७४, शिवसेना ३, काँग्रेस १३, उबाठा ०, मनसे ०
वसई-विरार – बविआ ७१, भाजप ४३, शिवसेना १, उबाठासह अन्य पक्ष ०
कल्याण-डोंबिवली – शिवसेना ५१, भाजप ४८, उबाठा ९, मनसे ५, काँग्रेस २, शरद पवार १
उल्हासनगर – भाजप ३८, शिवसेना ३६, काँग्रेस १
भिवंडी-निजामपूर – काँग्रेस ३०, भाजप २२, शिवसेना १२, शरद पवार १२
पिंपरी-चिंचवड – भाजप ८४, राष्ट्रवादी ३७, शिवसेना ६
पुणे – भाजप ९०, राष्ट्रवादी २०, काँग्रेस १०, शिवसेना २,
नाशिक – भाजप ७६, शिवसेना २९, राष्ट्रवादी ३, उबाठा ९, मनसे १, काँग्रेस ३
मालेगाव – शिवसेना १८, भाजप २
छत्रपती संभाजीनगर – भाजप ५८, शिवसेना १२, उबाठा ६, काँग्रेस १, शरद पवार १
नागपूर – भाजप १०२, शिवसेना २, काँग्रेस ३३, राष्ट्रवादी १, उबाठा २