मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी
ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणूक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७.३० ते ९.३० : ८ टक्के, सकाळी ११.३० पर्यंत : १९ टक्के, दुपारी १.३० पर्यंत : ३०.७५ टक्के आणि दुपारी ३.३० पर्यंत : ठाण्यात एकूण सुमारे ५५ टक्के मतदान नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सकाळच्या तुलनेत दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग वाढल्याचे चित्र दिसून आले. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. राज्यातील २९ महापालिकांपैकी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीसह ११ ठिकाणी शिवसेना-भाजप यांची युती असून, संध्याकाळच्या सत्रात मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता निवडणूक प्रशासनाने व्यक्त केली होती.
निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी आणि गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. पॅनेल पद्धतीमुळे चार मते टाकताना अनेक मतदार संभ्रमात पडले, तर अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया संथ झाली. काही ठिकाणी दिग्गज अपक्ष उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटणच लॉक झाल्याचा आरोप करण्यात आला असून, यामुळे मतदारांसह उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ही परिस्थिती म्हणजे लोकशाहीचीच हत्या असल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला आहे.
सायंकाळी उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. ठाणे महापालिका क्षेत्रात ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी ही निवडणूक झाली. शहरात एकूण १६ लाख ४९ हजार ८६९ मतदार असून, त्यात ८ लाख ६३ हजार ८७८ पुरुष, ७ लाख ८५ हजार ८३० महिला आणि १५९ इतर मतदार आहेत. या निवडणुकीसाठी १,१०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत ९९ अर्ज बाद ठरले, तर २६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अखेर ६४९ उमेदवार रिंगणात राहिले. शिवसेना (शिंदे गट) चे सहा उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.
मतदानाच्या दिवशी मतदारांना नाव शोधण्यासाठी तसेच मतदान केंद्र शोधण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. मतदार यादीत नाव नसल्याने काहींना मतदान न करताच माघारी परतावे लागले. तर अनेक ठिकाणी ईव्हीएममधील बिघाडामुळे मतदारांना केंद्राबाहेर ताटकळत उभे राहावे लागले. मतदान यंत्रांवर अ, ब, क, ड ऐवजी उलट क्रम लावण्यात आल्यानेही गोंधळ वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मानपाडा, कोलशेत, मनोरमानगर, सावकरनगर, इंदिरानगर, वागळे इस्टेट, पाचपखाडी, कळवा आदी भागांतील मतदान केंद्रांवर ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी आल्या. प्रभाग क्रमांक २१ मध्ये अपक्ष उमेदवाराच्या ‘फुगा’ चिन्हाचे बटण दाबले जात नसल्याचा आरोप झाला. तर प्रभाग क्रमांक ३ मधील सेंट झेवियर्स शाळेतील खोली क्रमांक १० व १२ मधील यंत्रांमधून शॉक लागत असल्याचे निदर्शनास आले. अनेक उमेदवारांनी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी रिक्षा व कारची व्यवस्था केली होती.
वयोवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग :
तांत्रिक अडचणी असूनही वयोवृद्ध मतदारांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. टेंभी नाका येथील ९९ वर्षीय माजी शिक्षिका लिला श्रोत्री, ८४ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक शांताराम शिंदे, ब्रम्हांड प्रभागातील १०१ वर्षीय पार्वती वाळुंज आणि वृंदावन सोसायटीतील १०३ वर्षीय भालचंद्र नलावडे यांनीही मतदान करून लोकशाहीप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.