पथनमथिट्टा (केरळ) : काँग्रेस पक्षाचे माजी नेते आणि आमदार राहुल ममकुटाथिल यांना महिलेशी गैरसंबंधान बाबत गंभीर आरोपांच्या तिसऱ्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री विशेष तपास पथकाने पलक्कड येथील एका हॉटेलमधून त्यांना ताब्यात घेतले. अटकेनंतर त्यांना पथनमथिट्टा येथील पोलीस एआर कॅम्पमध्ये नेण्यात आले. ही कारवाई सध्या कॅनडामध्ये वास्तव्यास असलेल्या तिरुवल्ला येथील एका विवाहित महिलेच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. संबंधित महिलेने ई-मेलद्वारे पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिचे सविस्तर जबाब नोंदवण्यात आले.
तक्रारीतील आरोप काय?
तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची राहुल ममकुटाथिल यांच्याशी ओळख झाली. पुढील संपर्कादरम्यान त्यांच्याकडून आर्थिक स्वरूपाचा गैरवापर आणि वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत शारीरिक शोषण, मानसिक दबाव आणि धमकीसदृश वर्तनाचे उल्लेख करण्यात आले असून, यासंदर्भातील काही पुरावे तपास यंत्रणेकडे सादर करण्यात आले आहेत.
पोलिसांचा तपास आणि कारवाई
तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी ममकुटाथिल यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, सात सदस्यांच्या पथकाने ही अटक केली. तपासाचा भाग म्हणून आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
यापूर्वीही दोन प्रकरणे
राहुल ममकुटाथिल यांच्याविरोधात यापूर्वीही महिलांच्या तक्रारींवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. एका प्रकरणात लग्नाचे आश्वासन देऊन शोषण आणि गर्भपातास भाग पाडल्याचा आरोप आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने अटकेस स्थगिती दिली होती.दुसऱ्या प्रकरणात त्यांना खालच्या न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता.
पक्षाची भूमिका आणि आरोपीचा दावा
पहिल्या प्रकरणानंतर काँग्रेस पक्षाने राहुल ममकुटाथिल यांना प्राथमिक सदस्यत्वातून वगळले होते. दरम्यान, ममकुटाथिल यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे प्रकरण राजकीय सूडबुद्धीतून उभं करण्यात आल्याचा दावा केला आहे.