अंबरनाथ : अंबरनाथ विकास आघाडीकडून सर्व ३१ नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आला असून, व्हीपचे उल्लंघन केल्यास थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शिवसेना (शिंदे गट)ला मोठा धक्का बसला आहे. अंबरनाथ विकास आघाडीचे गटनेते अभिजीत करंजुलेकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत या व्हीपबाबत स्पष्ट भूमिका मांडली.
“आम्ही सर्व ३१ नगरसेवकांना व्हीप जारी केला आहे. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अंबरनाथ विकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करावे लागेल. व्हीपविरोधात मतदान केल्यास संबंधित नगरसेवकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
अंबरनाथ नगर परिषदेत एकूण ५९ नगरसेवक आहेत. यापैकी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना काँग्रेसकडून निलंबित करण्यात आले होते आणि पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे १४, काँग्रेसचे १२ (भाजपमध्ये प्रवेश केलेले), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ४ आणि १ अपक्ष अशा एकूण ३१ नगरसेवकांनी मिळून ‘अंबरनाथ विकास आघाडी’ या नावाने जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र गटाची नोंदणी केली होती.






