अमेरिकेचे नवनियुक्त राजदूत सर्जिओ गोर यांचा राजदूत म्हणून पहिलाच दौरा होता, ज्यामध्ये त्यांनी यांसारख्या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली, तसेच भारत-अमेरिका संबंधांना महत्त्व दिले. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणि व्यापार करारांवर चर्चा पुढे नेण्याचा प्रयत्न दिसतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्जिओ गोर यांची भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती केली. हे ट्रम्प यांचे ज्येष्ठ सहकारी असून त्यांचा भारत दौरा सुरू झाला. या दौऱ्यात गोर भारतविरोधात ट्रम्प प्रशासनाने भारतावर लादलेले टॅरिफ कमी करण्यावर आणि त्याचे परिणाम कमी करण्यावर निश्चितच प्रयत्न करतील असे दिसते. सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारविषयक बोलणी सुरू आहे. त्याला गोर कितपत पुढे नेतात हे पाहावे लागेल. गोर यांच्या भारत दौऱ्यात अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण अनेक असे मुद्दे आहेत, की जे दोन्ही देशांना आव्हान ठरतील. यातील सर्वात प्रमुख मुद्दा हा आहे, की ट्रेड टॅरिफ आणि द्विपक्षीय व्यापार करार. यावर अद्याप निर्णय झाला नाही. अमेरिकेने भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला त्यामुळे भारत अमेरिका व्यापार बराच खाली आला. पण यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा हा, की भारतासह अनेक देश रशियाकडून तेल आयात करत असल्यामुळे त्यांच्याविरोधात संतापून जाऊन ट्रम्प यांनी अशा देशांवर ५०० टक्के टॅरिफ लावण्याचे बिल मांडले. अर्थात भारताकडून इतका जबर टॅरिफ वसूल करण्याचा अमेरिकेचा नेमकं उद्दीष्ट काय हे स्पष्ट झालं नाही. अमेरिकेचे व्यापार मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी म्हटले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष ट्रम्प यांना तो करार अंतिम निश्चित करण्यासाठी कॉल केला नाही म्हणून तो करार तसाच प्रलंबित राहिला. अर्थात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचा हा दावा फेटाळला. सध्या महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की अमेरिका रशियाकडून भारताने तेल खरेदी करू नये म्हणून प्रचंड दबाव आणत आहे. पण ते शक्य नाही. भारत रशिया यांची मैत्री प्रदीर्घ काळापासून आहे. जेव्हा अमेरिकेने १९७४ मध्ये आपल्या युद्ध नौका आणून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रशियाच भारतीय फौजांच्या मदतीला धावून आला होता आणि त्यामुळे या मैत्रीला भारत विसरू शकत नाही. त्यामुळे हा मुद्दा जेव्हा गोर यांच्या भारतीय नेत्याच्या भेटीदरम्यान येईल तेव्हा भारताला आपली भूमिका ठामपणे मांडावी लागेल.
भारत आणि रशिया यांच्यात पूर्वापार संबंध आहेत आणि त्यापासून फारकत घेऊन भारताला चालणार नाही. भारताचे सातत्याने रशियाशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत आणि राष्ट्रहित त्यातच जपले आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर येत आहेत. सर्जिओ गोर यांचे भारतात अशा वेळेला आगमन झाले आहे, जेव्हा दोन देशांतील संबंध विलक्षण ताणलेले आहे. पण गोर यांच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांनी ५०० टक्के टॅरिफ बिल मंजूर केले. हा भारताला मोठा धक्का आहे. भारताने रशियाकडून तेल आयात थांबवावी यासाठी अमेरिका सर्वोच्च प्राधान्य देईल हे अमेरिकेचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या या दबावाचा परिणाम म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा, पण भारताने रशियाकडून तेलाची आयात कमी केली. भारताचा हा निर्णय शहाणपणाचा आहे कारण अशा वेळेस अमेरिकेला नाराज करून चालणार नाही. परराष्ट्र धोरण म्हणजे अशीच तारेवरची कसरत असते आणि ती एस जयशंकर आणि इतर राजनैतिक अधिकारी करत आहेत. अमेरिकेने भारतावर रशियाकडून तेल खरेदी करू नका म्हणून प्रचंड दबाव आणला. वॉशिंग्टन बरोबर भारताचे अधिक संबंध व्हावेत अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. पण भारत रशियाबरोबर आपली मजबूत मैत्री कायम ठेवेल अशी शक्यता आहे. पण ट्रम्प यांनी भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादण्याची जी कृती केली, त्यामुळे अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आणि हा दोन्ही देशांचा पवित्रा तसेच वैयक्तिक ट्रम्प आणि मोदी यांच्यातील मैत्रीमुळे गुंतागुंतीची आणि नाजूक राजनैतिक परिस्थिती तयार झाली. व्यापार आणि भूराजकीय संघर्ष असे असतानाही दोन्ही देश या वातावरणातही संरक्षण, महत्त्वाच्या तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षा या क्षेत्रात सहकार्य करण्यावर विचार करत आहे. गोर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना भेटले आणि त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अजित डोवाल यांचीही भेट घेतली.
भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांना चीनचा धोका आहे आणि त्यापासून त्यांना एकत्र यावेच लागणार. त्यामुळे दोन्ही देश परस्पर जवळ आले. अर्थात यामुळे चीन सतर्क झाला. भारत आणि अमेरिकेची जवळीक चीनला सहन होणारी नाही. त्याचे पडसाद चीनच्या प्रतिक्रियेवरून येतील. पुतीन यांच्या भारत भेटीबद्दल चीन इतका नकारात्मक नाही. पण ट्रम्प आणि मोदी यांच्या संबंधांमुळे चीनच्या भुवया उंचावल्या तर यात नवल नाही. गोर यांचा दौरा म्हणजे परिचयात्मक दौरा आहे आणि २०२५ मध्ये गोर यानी मोदी यांची भेट घेतली होती त्याचाच हा पुढचा भाग आहे. पण एक निश्चित आहे ते म्हणजे गोर यांच्यासाठी भारत दौरा सोपा जाणार नाही. कारण त्यांच्यासाठी भारताला ट्रम्प यांच्या अलीकडील कृतींबाबत भारताचे समाधान करणे अवघड आहे. त्यातच भारतप्रणीत सौर ऊर्जा आघाडीतून अमेरिकेने माघार घेतली, ही बाब अमेरिकेला भारताला पटवून देणे अवघड जाणार. गोर यांच्या भेटीचा प्रमुख भर यावर राहील, की व्यापारविषयक बोलणी पुन्हा गतिमान होतील. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली तर अमेरिका टॅरिफ इतके लावणार नाही. अखेरचे म्हणजे अमेरिका भारतावर रशिया आणि चीन यांसंबंधी परराष्ट्र धोरणविषयक जवळ जाण्यासाठी दबाव आणत आहे आणि भारताचा मात्र आपल्या डावपेचात्मक स्वायत्तता यांच्याशी चिकटून रहाणार आहे. गोर यांची सुरुवात तर आश्वासक झाली आहे.