ठाणे : ठाणे पालिका निवडणूकीसाठी ३३ प्रभागांमध्ये विभाजन करण्यात आले असून १३१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रभाग क्रमांक १ ते २८ आणि ३० ते ३३ या ३२ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार जागांसाठी मतदान होणार असून, प्रभाग क्रमांक २९ मध्ये तीन जागांसाठी मतदान हवील अशी माहिती महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली. प्रभागानुसार बॅलेट युनिटवर तीन किंवा चार मतपत्रिका उपलब्ध असतील. प्रभागातील प्रत्येक जागेला ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ अशी नावे देण्यात आली असून, ‘अ’ जागेसाठी पांढरी, ‘ब’साठी फिकट गुलाबी, ‘क’साठी फिकट पिवळी आणि ‘ड’ जागेसाठी फिकट निळ्या रंगाची मतपत्रिका असेल.
मतदाराला सर्व जागांसाठी मतदान करणे बंधनकारक राहणार आहे. ३२ प्रभागांमध्ये चार आणि प्रभाग क्रमांक २९ मध्ये तीन मते नोंदविल्यानंतरच मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. प्रत्येक जागेसाठी उमेदवारांसह ‘नोटा’ (वरीलपैकी एकही नाही) पर्यायही उपलब्ध असेल. सर्व जागांसाठी मतदान पूर्ण केल्यानंतर ईव्हीएममधून शिट्टीचा आवाज येईल व यंत्रावरील दिवे बंद होतील.






