मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा; ठाकरेंनी वडापावव्यतिरिक्त मराठी माणसाकरता कधी स्वप्न पाहिले का?
मुंबई : कोरोना काळातील बॉडीबॅग घोटाळ्यातील दोषींना जेलमध्ये पाठवून मुंबई महानगरपालिकेत पारदर्शक आणि प्रामाणिक कारभार रुजवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. "कफनातही चोरी करणाऱ्या बेईमानांना संपवण्याचा आमचा संकल्प आहे. मुंबईकरांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना कठोर शासन करून मुंबईला नवसंजीवनी देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे", असे ते म्हणाले. तसेच ठाकरेंनी मराठी माणसाकरता वडापावव्यतिरिक्त कोणते मोठे स्वप्न पाहिले का? असा उपरोधिक सवाल करीत, ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नसून ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
शिवाजी पार्क येथे आयोजित महायुतीच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) अध्यक्ष रामदास आठवले, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजप नेते विनोद तावडे, मंत्री आशिष शेलार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे वरिष्ठ नेते व्यासपीठावर हजर होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मी उत्तर द्यायला लागलो तर अनेकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आमचा संकल्प हा कोणालातरी महापौर बनवण्याचा नाही. तर, पारदर्शक आणि प्रामाणिक कारभारातून मुंबईला बदलण्याचा आहे. मुंबईकरांच्या हक्काचा पैसा मुंबईकरांसाठीच वापरला गेला पाहिजे. बेईमान लोकांचे राज्य समाप्त करायचे आहे. कफनमध्येही जे चोरी करतात, अशा बॉडीबॅग घोटाळ्यातील दोषींना जेलमध्ये पाठवून मुंबईमध्ये मुंबईकरांच्या हक्काचे सरकार बसवण्यासाठी आम्ही आलो आहोत."
"आम्ही तीन जानेवारीला प्रचाराचा शुभारंभ केला, जो आई जिजाऊंच्या जन्मतिथीचा दिवस होता. आणि आज शिवतीर्थावरची ही शेवटची सभा, ही पुन्हा आई जिजाऊ मा साहेबांच्या जयंती दिवशी आहे. म्हणून आजच्या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचे स्मरण करतो". तसेच स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही नमन करत फडणवीस म्हणाले की, विवेकानंदांनी हिंदू संस्कृती आणि भगव्याचा झेंडा जगभर नेला. त्यांच्या या उल्लेखाने सभेला सांस्कृतिक आणि राष्ट्रीय भावनेचा स्पर्श मिळाला.
ठाकरे बंधूंच्या टीकेचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, "कालच्या सभेमध्ये पुन्हा तेच अपील, पुन्हा तीच कारणे, पुन्हा तेच मुद्दे. पण मी पुन्हा सांगतो, मुंबई कोणाचा बाप जरी आला तरी महाराष्ट्रातून तुटू शकत नाही. माझा सवाल आहे, जर आज मराठी माणूस अडचणीत दिसतो तर ३० वर्षे तुम्ही काय करत होता? २५ वर्ष महानगरपालिकेची सत्ता सांभाळली तरी मराठी माणूस अडचणीत असेल, तर 'चुल्लू भर पाण्यात बुडून मरा'", असा टोला त्यांनी लगावला.
आदित्यला उत्तर देण्यासाठी शीतल गंभीर पुरेशा
आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्याशी जमत नसेल तर आदित्यशी चर्चा करा. ठीक आहे, तुम्हाला पोराला प्रमोट करायचे आहे. पण, आमची उमेदवार शितल गंभीर त्याच्यासाठी पुरेशी आहे. उद्याच्या दिवसभरात कधीही सांगा, शितल गंभीर चर्चेसाठी येतील. खुले आव्हान स्वीकारा. मुंबईकरांसाठी शेवटची निवडणूक असा दावा ते करत आहेत, पण मुंबईकरांसाठी नाही तर त्यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे", असा टोला फडणवीसांनी लगावला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काही लोकांनी काल माझी नक्कल केली, पण नक्कल करता करता त्यांच्या काकांच्या पक्षाची काय स्थिती झाली? याचाही अभ्यास करा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
महाराष्टात मराठीच सक्तीची
"मराठीसाठी आम्ही एकत्रित आलो, असे ते सांगतात. या महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची असेल. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी त्रिभाषा सूत्रावर समिती तयार करण्याची घोषणा केली. १४ सप्टेंबर २०२१ ला या समितीने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अहवाल सादर केला. या अहवालाच्या इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिला वर्गापासून लागू करण्यात यावी, अशी शिफारस होती. त्यानंतर २० जानेवारी २०२२ ला उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळ बैठकीत या अहवालाला मान्यता दिली. यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत," असेही ते म्हणाले.
मुंबईत तिसरे विमानतळ उभारणार
"मुंबईच्या विमानतळावर एकच धावपट्टी होती, दुसरी धावपट्टी तयार करता येत नव्हती म्हणून इतक्या वर्षांपासून नवी मुंबईला विमानतळाची मागणी होती. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात पाच वर्षात आम्ही हे विमानतळ केले. आम्ही अजून तिसरे विमानतळही करणार आहोत. मुंबई विमानतळाची क्षमता दीड पट करणार आहोत."
विकासावर बोलायचे असल्यास मर्द असावे लागते
"धारावीच्या पुनर्विकासाचे पहिले टेंडर आम्ही विकासकाला दिले होते. पण उद्धव ठाकरे तुम्ही ते टेंडर रद्द का केले? तुम्हालाच अडाणींना ते द्यायचे होते का? आम्ही धारावीचा जागा कुणाला दिली नसून डीआरपीला दिले आणि त्यात सरकारसुद्धा आहे. तुम्हाला २५ वर्षात एकही काम करता आले नाही. विकासावर बोलायचे असल्यास मर्द असावे लागते. राहुल गांधी अडाणीविषयी बोलतात पण काँग्रेसशासित राज्यांमध्ये अदानी कडून कोट्यावधींची गुंतवणूक आणली. एकही मराठी माणूस बेरोजगार राहू नये यासाठी आम्ही जो महाराष्ट्रात येईल त्यांचे स्वागत करू. आपल्याकडे गुंतवणूक येत असेल आणि आपली अर्थव्यवस्था विस्तारित होत असेल तर आपण त्याचे स्वागत केले पाहिजे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
स्वार्थासाठी वेगळे झाले आणि स्वार्थासाठीच एकत्र आलेत - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "शिवतीर्थाचे आणि शिवसेनेचे अतूट नाते आहे. ही प्रचार सभा नाही तर परिवर्तनाची नांदी आहे. काल इथे झालेल्या सभेत नेहमीचेच शिव्याशाप, टोमणे होते. त्यांची आम्हाला सवय झाली आहे. आपली ही सभा कुणाला उत्तर देण्यासाठी नाही तर महायुतीने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आहे. मी नेहमी आरोपाला कामातून उत्तर देतो. लोकांना भावनेचे नाही तर विकासाचे राजकारण हवे आहे. बाळासाहेबांचे विचार आणि मोदीजीचे व्हिजन घेऊन आपण पुढे जात आहोत. काही लोकांना फक्त निवडणूक आली की, मराठी माणसाची आठवण येते. एरवी ते ढुंकूनही पाहत नाही. मराठी माणसाच्या आजच्या अवस्थेला हेच लोक जबाबदार आहेत. ही मराठी माणसाची शेवटची लढाई आहे, असे भावनिक आवाहन कुणीतरी केले. पण मराठी माणसाचे अस्तित्व आजही धोक्यात नाही आणि उद्याही नसेल. मुंबईतील मराठी माणसाचे महत्व कधीही कमी होणार नाही. येणारा महापौर हा महायुतीचा आणि मराठीच असेल. मुंबईकरांना मूलभूत सोयीसुविधा आणि रोजगार हेच आमचे मिशन आहे. आज जे लोक मराठी माणसाच्या नावाने गळे काढतात ते निवडणूक संपल्यानंतर आराम करायला कुठे जातात हे सर्वांना माहिती आहे. २० वर्षांपूर्वी बाळासाहेबांची ईच्छा पूर्ण केली नाही. त्यावेळी तुमचा अहंकार मोठा होता. तुम्ही स्वार्थासाठी वेगळे झालात आणि आता स्वार्थासाठीच एकत्र आला आहात."
महायुतीचा महापौर बसविण्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा - केंद्रीय मंत्री रामदास आठवले
"भरून गेलेले आहे मैदान शिवाजी पार्क, मी महायुतीला देतो १५० मार्क, ठाकरे बंधूंना देतो ४० मार्क, काँग्रेसला देतो ३० मार्क आणि बाकीचे सगळे आमचे मार्क, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. तसेच कालच्या सभेपेक्षा आज जास्त माणसं दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. महायुतीची मुंबईत येणार सत्ता आणि ठाकरे बंधूंचा उडून जाणार पत्ता. उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत राहायला हवे होते. तुम्ही आमच्यासोबत राहिले असते तर धनुष्यबाण तुमच्याकडे असता, पण आज धनुष्यबाण आमच्याकडे आहे. मुंबईत महायुतीचा महापौर बसविण्यासाठी माझा पाठिंबा आहे," असेही ते म्हणाले.
२५ वर्षात उद्धव ठाकरेंनी बंगला नंबर २ बांधला - आ. अमीत साटम
"तुम्ही २५ वर्षे मुंबई महापालिकेवर राज्य करूनही त्यावेळी केलेले एक काम दाखवण्यासारखे नाही. उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचार केला आणि बंगला नंबर दोन तयार केला. दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या पाच टक्क्यांवर हे जगतात. उद्धव ठाकरेंचा महापौर झाल्यास मुंबईचे पाकिस्तान होईल. तुम्हीच अदाणींना घरी बोलवून त्यांच्या गळाभेटी घेतला. तुमची पोरं त्यांच्या लग्नात नाचतात. या ढोंगीपणाला आणि दुटप्पीपणाला मुंबईकर जनता भुलणार नाही. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आमच्या सर्व उमेदवारांना साथ द्यावी," असे आवाहन मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी केले.