माजी शहराध्यक्ष मनोज घरत यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
डोंबिवली : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कल्याण–डोंबिवलीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभागांतील प्रचार शिगेला पोहोचल्यावरच मनसेचे माजी डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज (रविवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. याआधी घरत यांनी भाजपचे उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. रविवारी डोंबिवली पश्चिमेतील पॅनल २२ मध्ये आयोजित भाजपच्या सभेत, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घरत यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी घरत यांच्यासह रवी गरुड, केदार चाचे, संदीप शिंदे, संतोष शिलकर, निनाद मिसाळ यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. घरत भावनिक झाल्याचे दिसून आले; त्यांनी २० वर्षे एका पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानंतर वेगळा निर्णय घेण्याचे कारण सांगितले.
राजकीय घडामोडींचा फटका पॅनल २७ मध्ये बसला. महेश पाटील यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या घरत यांनी माघार घेतल्यामुळे महेश पाटील बिनविरोध निवडून आले. महेश पाटील यांनाही काही महिन्यांपूर्वी शिंदे सेनेतून भाजपात प्रवेश करून विजय मिळवला होता. मनोज घरत हे केवळ उमेदवार नव्हते, तर मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष होते आणि माजी नेते राजू पाटील यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. घरत यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या विद्यार्थी सेनेला नवसंजीवनी मिळाली होती आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते.
मनोज घरत यांचे भाजपमध्ये प्रवेश मनसेसाठी मोठी हानी ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे पॅनल २७ मधील महेश पाटील विरुद्ध घरत यांची सरळ लढत, ऐनवेळी घरतांनी माघार घेतल्यामुळे राजकीय समीकरणे पालटली.






