बिअरची विक्री सर्वाधिक; वाईनमध्ये घट
अलिबाग : रायगड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात मद्यविक्रीने उच्चांक गाठला असून, तब्बल ४३ लाख २७ हजार ५२५ बल्क लिटर दारू तळीरामांनी रिचवली. यामध्ये बिअरची विक्री सर्वाधिक झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क रायगड विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. देशी व विदेशी दारूपेक्षा बिअरला मद्यपींची पसंती मिळाल्याने वाईनच्या विक्रीत मात्र लक्षणीय घट नोंदवली गेली.
डिसेंबरमध्ये नाताळसह थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यात पर्यटक दाखल झाले होते. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, कॉटेज पर्यटकांनी फुल्ल होते. दहा लाखांहून अधिक पर्यटकांनी या कालावधीत जिल्ह्याला भेट दिल्याने मद्यविक्रीत प्रचंड वाढ झाली. अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यविक्रीचे परवानेही देण्यात आले. आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यात ४३ लाख २७ हजार ५२५ बल्क लीटर इतकी दारु मद्यपींनी रिचवली असल्याची माहिती समोर आली. त्यामध्ये ९ लाख ५१ हजार ३८१ बल्क लीटर देशी दारु, ९ लाख १४ हजार ४२६ बल्क लिटर विदेशी दारू, २४ लाख ९६ हजार ९६० बल्क लीटर बिअर आणि ६४ हजार ७५८ वाईन विकली गेली. यावरुन बिअरची क्रेझ किती वाढली, हे स्पष्ट होते. विदेशी दारूच्या किमतीमध्ये तीस टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याने मद्यपींनी बिअरकडे मोर्चा वळवला. ६५० रुपयांची बाटली ९०० रुपयांपर्यंत गेली असून, प्रत्येक क्वॉर्टरमागे साठ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे यंदा विदेशी दारुपेक्षा बिअर पिण्याकडे मद्यपींचा कल अधिक दिसून आला. एकंदरीत वाढते पर्यटन, सण-समारंभ आणि महागलेली विदेशी दारू यांचा परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यात डिसेंबरमध्ये बिअरची विक्री विक्रमी, तर वाईनची विक्रीत घट झाल्याचे समोर आलेे.
दारू विक्री : देशी - ९ लाख ५१ हजार ३८१; विदेशी - लाख १४ हजार ४२६; बिअर - २४ लाख ९६ हजार ९६०; वाईन - ६४ हजार ७५८
विदेशी दारूच्या विक्रीमध्ये भरमसाट वाढ करण्यात आली. १५० रुपयांना मिळणारी दारू २०० हून अधिक रुपयांनी बाजारात विकण्यात आली. त्यामुळे यंदा विदेशी दारूपेक्षा बिअरला विक्रीला मद्यपींना पसंती दर्शविली. त्याचा परिणाम विदेशी दारूच्या विक्रीवर झाला असल्याची माहिती समोर येत आहे. दारू पिण्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मद्यपींची संख्या वाढत आहे.