बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार
कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ (नेव्ही बेस) उभारणार असल्याची माहिती संरक्षण सूत्रांच्या अहवाल्याने दिली आहे. चीनच्या वाढत्या नौदल हालचाली तसेच बांगलादेश–पाकिस्तानशी संबंधित बदलत्या प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. यामुळे उत्तर बंगालच्या उपसागरात भारताची सागरी उपस्थिती अधिक मजबूत होणार आहे.
हा तळ पूर्ण स्वरूपाचा नौदल कमांड नसून तो नेव्हल डिटॅचमेंट म्हणून कार्य करणार आहे. येथून लहान युद्धनौका आणि हायस्पीड बोटी तैनात केल्या जाणार आहेत. ज्यामुळे सागरी पाळत, गस्त आणि तत्काळ कारवाईची क्षमता वाढणार आहे. नौदल सध्या असलेल्या हल्दिया डॉक कॉम्प्लेक्सचा वापर करणार असल्याने कमी अतिरिक्त पायाभूत सुविधांमध्ये हा तळ लवकर कार्यान्वित करता येणार आहे. सुरुवातीला स्वतंत्र जेट्टी उभारली जाईल आणि आवश्यक सहायक सुविधा विकसित केल्या जातील.
या तळावर सुमारे १०० अधिकारी आणि खलाशी तैनात असतील. हल्दिया हे कोलकातापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असून येथे थेट बंगालच्या उपसागरात प्रवेश मिळतो. त्यामुळे हुगळी नदीमार्गे होणारा वेळेचा अपव्यय टळणार असून नौदलाची प्रतिसाद क्षमता अधिक वेगवान होईल.
हल्दिया तळावर फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट आणि ३०० टन वजनाची न्यू वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट तैनात केली जाणार आहे. या बोटी ४० ते ४५ नॉट्स म्हणजेच सुमारे ८० किमी प्रतितास वेगाने धावू शकतात. या बोटींमधून १० ते १२ जवान वाहून नेले जाऊ शकतात. त्यांचा उपयोग किनारी गस्त, घुसखोरी रोखणे, बंदर सुरक्षेसह विशेष मोहिमांसाठी केला जाणार आहे.
या नौकांवर CRN-९१ तोफा बसवण्यात येणार असून भविष्यात नागास्त्रसारख्या लोइटरिंग म्युनिशन सिस्टीम बसवण्याची शक्यता आहे. यामुळे अचूक हल्ला क्षमता आणि पाळत ठेवण्याची ताकद अधिक वाढणार आहे.
हे पाऊल नौदलाच्या व्यापक आधुनिकीकरण आणि विस्तार कार्यक्रमाचा भाग आहे. २०२४ मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डिफेन्स ॲक्विझिशन कौन्सिलच्या बैठकीत १२० फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट आणि ३१ NWJFAC खरेदीला मंजुरी देण्यात आली होती. हल्दियातील हा नवा तळ भारताच्या सागरी सुरक्षेला नवे बळ देणारा ठरणार आहे.