“अलीकडच्या काळात काही लोक देव आहेत की नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत आहेत. काही जण देवाची खिल्ली उडवत आहेत. त्यांच्याबद्दल मी फार काही बोलणार नाही. मात्र नाशिकचा खरा विकास झाला असेल आणि पुढे होणार असेल, तर तो करण्याची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षात आहे,” असे फडणवीस म्हणाले. नाशिक ‘दत्तक’ घेतल्याच्या वक्तव्यावरून होत असलेल्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. “माझी खिल्ली उडवली गेली की नाशिक दत्तक घेतलं, त्याचं काय झालं? मी 2017 आणि 2019 मध्ये विरोधी पक्षनेता होतो. फक्त दोन वर्ष माझ्याकडे होती, तरी मी कधी तक्रार केली नाही. आम्ही तक्रार करणारे लोक नाही,” असे ते म्हणाले.
कोविड काळाचा उल्लेख करत फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “कोविडच्या काळात उबाठा, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते. त्या काळात देवाभाऊ नाशिकमध्ये होते. कोविड केअर सेंटरपासून आयसीयूपर्यंत ते फिरत होते. पण निवडणुका आल्या की नाशिकला येणारे आणि संपल्या की विसरणारे हे निवडणूक पर्यटक आहेत,” असा आरोप त्यांनी केला.