Sunday, January 11, 2026

विशाल मुंबई शिक्षण प्रसारक मंडळाचे आदर्श विद्यालय

विशाल मुंबई शिक्षण प्रसारक मंडळाचे आदर्श विद्यालय

दि विशाल मुंबई शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली. भाऊ राणे, लक्ष्मण आर. प्रभू, विश्वनाथ लाडोबा तारी, खोत सर, संसारे गोरेगावातील सिद्धार्थनगरमधील या मंडळींनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने सुरुवातीला ‘विशाल मुंबई’ नावाचे साप्ताहिक काढले जात होते.

शाळेची स्थापना वर्ष :- जून १९६० माध्यमिक विभाग जून १९६९ प्राथमिक विभाग जून १९८६ पूर्व प्राथमिक विभाग

शाळेचे पहिले मुख्याध्यापक म्हणून श्री. नेरुळकर यांची नेमणूक झाली. त्यावेळी क्लार्क म्हणून श्री. घोलप व शिपाई म्हणून श्री. सहदेव काका यांची नेमणूक झाली. शिक्षक म्हणून खोत सर, श्रीमती शिरोडकर मॅडम, श्रीमती बापट मॅडम, श्रीमती गौतम मॅडम असे शिक्षक नेमले होते. १९६०-६१ साली शाळेची पहिली १० वीची बॅच शाळेतून बाहेर पडली. शाळेतून पहिला येणारा विद्यार्थी म्हणजे श्री. महेश मुणगेकर होय. सुरुवातीला शाळेचा निकाल ३४-३५ टक्के असाच होता. दरवर्षी निकालामध्ये वृद्धी होत गेली आणि १९६५-६६ साली शाळेचा निकाल ६० टक्के लागला व श्री. अजित शिरोडकर हा विद्यार्थी गोरेगावातून पहिला आला. त्यानंतर मग शाळेची उत्तरोत्तर प्रगतीच होत गेली. १९८५ साली शाळेचा विद्यार्थी कु. संदीप बागलकर एस.एस.सी बोर्डात २५ वा आला. २००६ साली कु. रोहित पवार हा विद्यार्थी एस.एस.सी बोर्डात १७ वा आला, तर कु. नितेश रोकडे हा विद्यार्थी २०१३ साली मराठी विषयात सर्वप्रथम आला. २०१७ साली ९७ टक्के, २०१८ साली ९५ टक्के, २०१९ साली ९८ टक्के, २०२० साली १०० टक्के शाळेचा १० वीचा निकाल लागला. १९९७-९८, १९९८-९९, १९९९-२००० असे सलग तीन वर्षी शाळेला के (पश्चिम) विभागातून “उत्कृष्ट शाळा” पुरस्कार मिळाला त्यानंतर याच विभागातून अजून ४ वेळा असे एकूण ७ वेळा शाळेने “उत्कृष्ट शाळा” पुरस्कार मिळवला आणि सातत्याने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या के (पश्चिम) विभागात विज्ञान प्रदर्शनातून अनेक प्रकल्पांना पुरस्कार मिळत आहे.

शैक्षणिक प्रमाणेच खेळातही शाळेचे नाव प्रसिद्ध झाले आहे. मुंबई पश्चिम विभागातून कायम शाळेला पारितोषिकं मिळाली आहेत. खो-खोचे अनेक विद्यार्थी राज्यस्तरावर खेळत आहेत. चित्रकलेमध्येही भरपूर स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन नावलौकिक मिळवला आहे. शाळेची स्नेहसंमेलनही खूप गाजली. स्नेहसंमेलनातून “राजा शिवाजी”, संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, गीत रामायण अशी दर्जेदार नाटके विद्यार्थ्यांनी सादर केली. याच बरोबर इ १ ली ते ८वी च्या विद्यार्थ्यांना शाळेतून मोफत पाठ्यपुस्तके वाटप, शालेय साहित्य व पौष्टिक व सात्विक असा पोषण आहार मोफत दिला जातो. निसर्ग मंडळ, विज्ञान मंडळ ही तर शाळेची आभूषणे आहेत यातून पर्यावरण संवर्धन, किशोरवयीन मुलामुलींचे प्रबोधन, व्यवसाय मार्गदर्शन, स्त्रियांचे सक्षमीकरण, विविध निसर्गभेटी, शालेय परिसर स्वच्छता, प्रभातफेरी, घोषवाक्य स्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंधस्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकौशल्य स्पर्धा तज्ज्ञांची व्याख्याने, हस्तलिखित तयार करणे, शैक्षणिक प्रकल्प तयार करणे, योद दिन, वाचन प्रेरणा दिन, शिक्षक पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, मुलांचे व पालकांचे समुपदेशन कार्यक्रम, पोक्सो कायदा समिती, बाल हक्क सुरक्षा समिती यांसारखे विविध उपक्रम विद्यार्थ्यांना सक्षम बनवतात.

विविध कार्यशाळा आयोजित करून शिक्षकांना प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात मोठ्या प्रमाणात केला जात आहे. विस्तृत क्रीडांगण, क्रीडा साहित्य, शैक्षणिक साधने, अद्ययावत संगणक कक्ष, सुसज्ज प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, अत्याधुनिक चित्रकला कक्ष या सर्व सोयींचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येत आहे. अशा तऱ्हेने शैक्षणिक, सांस्कृतिक, खेळ अशा सगळ्याच विभागात शाळा नावारूपाला आलेली आहे. आज उपक्रमशील शाळा म्हणून गोरेगाव विभागात शाळेचे नाव आहे. बदलत्या कालानुरूप विद्यालयाच्या जुन्या वास्तूची जागा आज नव्या भव्य वास्तूने घेतलेली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शाळेतही नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग अध्यापनात केला जात आहे. मराठी अस्मिता, संस्कृती व परंपरा याची जपणूक करत आज शाळा ६१ व्या वर्षाकडे यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या आमच्या विद्यालयासाठी म्हणावेसे वाटते... कटीखांद्यावर घेऊनी यश शिखरे दत्तगुरूंच्या सावलीत... उभी ही ‘आदर्श विद्यालय’ माउली पावले चिमुकली भक्कम करण्या... आदर्शची फौज सदा झटली आदर्शच्या अंगणात या... गुणसुमनांची पाती ही रुजली पंख यशाचे घेऊनी उडती पाखरे याच प्रांगणातूनी . घेऊनी सहा दशकांची गर्द सावली औदुबरासम ... उभी ही ‘आदर्श विद्यालय’ माउली.

Comments
Add Comment