नाशिक:निफाड तालुक्यात कडाक्याच्या थंडीने पहिला बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवगाव (ता. निफाड) येथील २२ वर्षीय तरुणाचा अतिथंडीमुळे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
देवगाव येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ शुक्रवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास समीर दौलत सोनवणे (वय २२) हा तरुण मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसपाटील सुनील बोचरे यांनी लासलगाव पोलिसांना तत्काळ कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिथंडीमुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली असून, शुक्रवारी निफाड गहू कृषी संशोधन केंद्रात किमान तापमान ६.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. याआधी गुरुवारी प्रथमच ५.९ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदले गेले होते. गुरुवारी रात्री प्रचंड गारठा जाणवत असल्याने रस्त्यांवरील वर्दळही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र होते.
नाशिक शहरातही तापमानाचा पारा घसरून शुक्रवारी ९.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. गेल्या २४ तासांत तापमानात सुमारे दोन अंशांची घट झाली असून, मागील पाच दिवसांत पाच ते सहा अंश सेल्सिअसने तापमान कमी झाले आहे. हीच परिस्थिती जिल्हाभरात पाहायला मिळत आहे.
कडाक्याची थंडी गहू, कांदा तसेच इतर रब्बी पिकांसाठी पोषक ठरणार असली तरी वाढत्या थंडीमुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी योग्य ती काळजी घ्यावी, उबदार कपडे वापरावेत, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.