वाह रे वाह... पटसंख्या वाढवण्यासाठी दहावीनंतर बारावीपर्यंतचे कॉलेज सुरू करणार म्हणे
उबाठा- मनसेचा वचननामा, आमचा पंचनामा
सचिन धानजी : दहावीनंतर गळती रोखण्यासाठी महापालिका शाळा इमारतीत बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन उबाठा आणि मनसे युतीच्यावतीने आपल्या जाहिरनाम्यात देण्यात आले असले तरी मुंबई महापालिकेची बंधनकारक कर्तव्य हे प्राथमिक शिक्षणाचे आहे . तरीही मुंबई महापालिका शाळांमध्ये आठवीच्या पुढील दहावीपर्यंत शिक्षण दिले जात आहे . महापालिकेच्या शाळांमधील गळती ही प्राथमिक शाळांमध्ये लागलेली असून यासाठी पहिलीपासूनच्या मुलांची पटसंख्या वाढवणे आवश्यक आहे. परंतु उबाठा आणि मनसे युतीचा उफरटा कारभार सुरु असून त्यांना महापालिकेच्या शाळांमधील गळती थांबवण्याऐवजी कनिष्ठ महाविद्यालय सुरु करून महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेवरील ताण वाढवायचा आहे. . एवढेच नाही तर महापालिकेच्या तीन शाळांमध्ये बारावी पर्यंत खासगी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कनिष्ठ महाविद्यालय सुरु केल्यानंतरही त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसताना महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेसह आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उबाठा मनसेच्यावतीने शिवशक्तीचा वचननामा प्रदर्शित केला आहे. यामध्ये शिक्षण विभागावर आश्वासनांची खैरात करत महापालिका शाळा कदापी बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही असे म्हटले आहे . मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जुन्या इमारतींचा तसेच मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास महापालिकेच्यावतीने केला जात असून केवळ शालेय इमारतीसाठी राखीव असलेल्या भूखंडांचा विकास खासगी विकासकाकडून करून शालेय इमारत विकासकाकडून बांधून घेतली जात आहे. याला तत्कालिन महापालिकेतील उबाठा शिवसेनेच्या महापौरांसह नेत्यांनीच मान्यता दिलेली आहे.
शिक्षण अनुभव सहज, सुंदर आणि प्रभावी व्हावा यासाठी आठवीपुढील प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब देणार असल्याची घोषणा केली आहे.. परंतु सन २०१५-१६ पासून महापालिका शाळांमधील मुलांना टॅब देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीच्या अभ्यासासह आधुनिक पद्धतीचाही सराव व्हावा, तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी शालेय वेळेत टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या टॅबमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेण्यास मदत होत आहे. टॅब कसा हाताळावा, त्याचा अभ्यासात उपयोग कसा करावा, याबाबत शिक्षकही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, त्यामुळे एकप्रकारे गरीब विद्यार्थ्यांची आणि पालकांची दिशाभूल करण्याचे काम उबाठा शिवसेनेकडून केले जात आहे.
महापालिकेच्या सर्व माध्यमांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी बोलतो मराठी हा हसत खेळत मराठी शिकवणारा डिजिटल उपक्रम सुरु करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे संपर्क फाऊंडेशनच्यावतीने मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये स्मार्ट बोर्डवर फिल्म, जिंगल स्वरुपात मराठीतून दाखवून मनोरंजनातून शिक्षणही देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुंबई महापालिकेची वाचनालय ही अत्याधुनिक आणि डिजिटल केली जातील . आणि प्रत्येक वाचनालय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असेल असे आश्वासन उबाठा दिले असले तरी ज्या शाळांमध्ये वाचनालये आहेत तिथे तिथे आवश्यकतेनुसार डिजिटल करण्यात आली आहेत. तसेच तिथे अभ्यासिकाही सुरु करण्यात आलेल्या आहेत.