Iran Crisis: इराणमध्ये महागाईचा वणवा! १०० शहरांत जनआक्रोशाचा भडका, ८ मुलांसह ४५ जणांचा मृत्यू

तेहरान विमानतळ आणि इंटरनेट सेवा ठप्प


तेहरान : इराणमध्ये वाढत्या महागाईच्या वणव्याने आता उग्र रूप धारण केले असून, गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या निदर्शनांनी गुरुवारी रात्री भीषण वळण घेतले. सीएनएनच्या अहवालानुसार, हे आंदोलन आता केवळ एका भागापुरते मर्यादित न राहता देशातील १०० हून अधिक शहरांमध्ये पसरले आहे. संतप्त निदर्शकांनी रस्त्यांवर उतरून ठिकठिकाणी जाळपोळ केली असून, इराणच्या सर्वोच्च नेत्यांविरुद्ध म्हणजेच "खमेनींचा मृत्यू" आणि "इस्लामिक रिपब्लिकचा अंत" अशा जोरदार घोषणा देत संपूर्ण देश डोक्यावर घेतला आहे. या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे अनेक ठिकाणी निदर्शकांनी माजी क्राउन प्रिन्स रझा पहलवी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. "ही शेवटची लढाई आहे, शाह पहलवी परत येतील," असे म्हणत निदर्शकांनी विद्यमान सत्तेला थेट आव्हान दिले आहे. यामुळे हे आंदोलन केवळ महागाईविरोधात न राहता सत्तापालटाच्या दिशेने झुकताना दिसत आहे. अमेरिकन मानवाधिकार संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या संघर्षात आतापर्यंत ८ चिमुरड्यांसह किमान ४५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आंदोलनादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला झाल्याचीही घटना घडली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा दलांनी आतापर्यंत २,२७० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात इंटरनेट आणि फोन सेवा बंद करण्यात आली असून, तेहरान विमानतळही तूर्तास बंद ठेवण्यात आले आहे. लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून इराणमध्ये यादवी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.



इरानिर्वासित प्रिन्स रझा पहलवींच्या आवाहनानंतर जनसागर रस्त्यावर


इराणमधील महागाईविरोधी आंदोलनाने आता थेट सत्तापालटाच्या मागणीचे रूप धारण केले आहे. अमेरिकेत निर्वासित जीवन जगणारे इराणचे शेवटचे शाह मोहम्मद रझा पहलवी यांचे पुत्र, प्रिन्स रझा पहलवी यांनी इराणी जनतेला रस्त्यावर उतरण्याचे जाहीर आवाहन केल्यामुळे निदर्शनांचा वणवा अधिकच भडकला आहे. या आवाहनानंतर तेहरानमधील मुख्य बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने विद्यापीठ परिसराचा ताबा घेतला आहे. आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी इराण सरकारने देशभरातील इंटरनेट आणि फोन लाईन्स पूर्णपणे खंडित केल्या आहेत. 'नेटब्लॉक्स' या इंटरनेट वॉचडॉगने या कृतीचे वर्णन 'मोठ्या हिंसक कारवाईची पूर्वतयारी' असे केले आहे. मात्र, या डिजिटल अडथळ्यांना झुगारून अनेक नागरिक 'स्टारलिंक' सारख्या आधुनिक प्लॅटफॉर्मच्या मदतीने इराणमधील भीषण परिस्थितीचे व्हिडिओ जगासमोर आणत आहेत. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर सत्तेवरून पायउतार व्हावे लागलेल्या पहलवी घराण्याचे वारसदार प्रिन्स रझा पहलवी सध्या अमेरिकेतून आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी सोशल मीडियाद्वारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. "मुक्त जगाचे नेते म्हणून ट्रम्प यांनी इराण सरकारला जबाबदार धरण्याची जी गरज व्यक्त केली, ती प्रशंसनीय आहे. आता जगातील इतर नेत्यांनीही त्यांचे मौन सोडावे आणि इराणी जनतेच्या हक्कासाठी ठोस पावले उचलावीत," असे आवाहन त्यांनी केले आहे.



"जर निदर्शक मारले गेले तर आम्ही हल्ला करू"




या अशांततेच्या दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा एकदा निदर्शक मारले गेले तर इराणवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प म्हणाले, "मी त्यांना सांगितले आहे की जर त्यांनी लोकांना मारायला सुरुवात केली, जसे ते त्यांच्या दंगलींमध्ये करतात, तर आम्ही त्यांना खूप जोरदारपणे लक्ष्य करू."



७२ टक्के महागलं अन्नधान्य; कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेमुळे जनतेचा सरकारवर एल्गार


इराण सध्या इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सामना करत असून, यामुळे देशातील तरुण पिढी म्हणजेच 'जनरेशन झेड' (Gen Z) मध्ये सरकारविरोधात तीव्र संताप निर्माण झाला आहे. देशाच्या चलनाचे मूल्य सातत्याने घसरत असून, डिसेंबर २०२५ मध्ये इराणी चलन 'रियाल'ने नीचांकी स्तर गाठला. एका अमेरिकन डॉलरची किंमत तब्बल १.४५ दशलक्ष रियालपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या एकाच वर्षात रियालच्या मूल्यात निम्म्याने घट झाली असून, इराणची अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे. या आर्थिक पडझडीचा थेट फटका सामान्य जनतेच्या ताटात बसला आहे. अन्नधान्याच्या किमतींमध्ये ७२ टक्क्यांनी प्रचंड वाढ झाली असून, औषधांचे दर ५० टक्क्यांनी वाढल्याने आरोग्य व्यवस्थाही सामान्यांसाठी महागली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईमुळे लोकांचे जगणे असह्य झाले असून, ठिकठिकाणी उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आधीच महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या जनतेला २०२६ च्या नव्या अर्थसंकल्पाने मोठा धक्का दिला आहे. सरकारने करामध्ये तब्बल ६२ टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावामुळे जनतेच्या संयमाचा बांध सुटला असून, देशभर व्यापक जनक्षोभ निर्माण झाला आहे. लोकांकडे खर्च करायला पैसे नसताना सरकार कराचा बोजा वाढवत असल्याचा आरोप करत आता नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आहेत.



क्राउन प्रिन्स रझा पहलवींकडे सत्ता सोपवा


इराणमध्ये १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर सुरू झालेली 'अयातुल्ला' राजवट आता इतिहासातील सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करत आहे. अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्यानंतर गेल्या ३७ वर्षांपासून सत्तेत असलेले सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यकाळात इराण आर्थिक गर्तेत रुतला आहे. आंतरराष्ट्रीय निर्बंध, प्रचंड बेरोजगारी, महागाई आणि चलनाचे झालेले ऐतिहासिक अवमूल्यन यामुळे त्रस्त झालेली जनता आता बदलासाठी आक्रमक झाली असून, निर्वासित क्राउन प्रिन्स रझा पहलवी यांना पुन्हा सत्तेवर आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या ४७ वर्षांतील कठोर धार्मिक निर्बंध आणि ढासळलेली अर्थव्यवस्था यामुळे इराणमधील तरुण पिढीमध्ये मोठा असंतोष आहे. ६५ वर्षीय क्राउन प्रिन्स रझा पहलवी यांच्याकडे जनता आता एक 'धर्मनिरपेक्ष' आणि 'लोकशाही' पर्याय म्हणून पाहत आहे. इराणला पुन्हा जागतिक प्रवाहात आणण्यासाठी आणि वैयक्तिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पहलवींचे नेतृत्व आवश्यक असल्याचा विश्वास आंदोलकांमध्ये निर्माण झाला आहे. सामान्य जनतेचा आणि तरुणांचा असा ठाम विश्वास आहे की, जर सत्ता हस्तांतरण होऊन रझा पहलवी परतले, तर इराणला आर्थिक स्थिरता लाभेल. पाश्चात्य देशांशी संबंध सुधारून आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवले जातील आणि देशाला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येतील, अशी आशा निदर्शकांनी व्यक्त केली आहे. "आता धर्मसत्ता नको, तर लोकशाही हवी," अशा घोषणांनी इराणचे रस्ते दुमदुमून गेले आहेत.

Comments
Add Comment

पैसे घ्या आणि ग्रीनलँड द्या, ट्रम्पनी दिली मोठी ऑफर

वॉशिंग्टन डीसी : कायम हिमाच्छादित असलेल्या ग्रीनलँड द्वीप समुहाला कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेचा भाग

Donald Trump : ट्रम्पचा रशियाविरोधी कृत्यांमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सत्तेत येताना युक्रेन युद्ध थांबवण्याचे आणि

चीन, इराण, रशिया आणि क्युबाशी आर्थिक संबंध तोडा : अन्यथा… तेल उपशावर बंदी

डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हेनेझुएलाला नवा इशारा वॉशिंग्टन : व्हेनेझुएलाच्या अंतरिम अध्यक्ष डेल्सी रॉर्डिग्ज

बंगालच्या खाडीत धोक्याची घंटा; चीन, पाकिस्तान, बांग्लादेशची भारताविरोधात हालचाल

नवी दिल्ली : सध्याच्या बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे भारताच्या सुरक्षिततेसमोर नवी आव्हाने उभी ठाकली

अमेरिकेच्या विस्तारवादी भूमिकेला युरोपीय राष्ट्रांचा विरोध

ट्रम्प यांच्या 'धमकी'विरोधात जर्मनी, फ्रान्ससह ७ देश एकवटले वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

थायलंडमध्ये भारतीय पर्यटकाला रस्त्यात तुडवलं; ‘सर्व्हिस’घेतली अन् पैसे कमी दिले

सध्या सोशल मिडिया वर एक व्हिडीओ व्हायरल होतआहे.लैंगिक सेवा पुरवल्यानंतर पैशांवरुन झालेल्या वादातून तृतीयपंथी