अधिकृत उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश
कल्याण : महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच उबाठा गटाला कल्याणमध्ये मोठा धक्का बसला आहे. मशाल चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या अधिकृत उमेदवाराने अचानक माघार घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा देत थेट पक्षप्रवेश केला आहे.
रामचंद्र माने असे या उमेदवाराचे नाव असून, त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. माने हे केवळ पाठिंबा देऊन थांबले नसून त्यांनी प्रत्यक्ष शिंदे गटात प्रवेश केल्याने उबाठा गटाला हा मोठा राजकीय झटका मानला जात आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्रमांक ३० (ड) मधून शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन पाटील निवडणूक लढवत होते. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून रामचंद्र माने उमेदवार होते. मात्र, मतदानास अवघे आठ दिवस शिल्लक असताना माने यांनी माघार घेतल्यामुळे आता पाटील यांच्याविरोधात एकही उमेदवार उरलेला नाही.
शिंदे गटाचे सात नगरसेवक बिनविरोध
या घडामोडीनंतर अर्जुन पाटील यांची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाचे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक सात झाले आहेत. याआधी महायुतीतील तब्बल २० नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, माने यांच्या प्रवेशामुळे महायुतीची ताकद आणखी वाढली आहे. दरम्यान, भाजपचेही १४ नगरसेवक बिनविरोध विजयी झाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेत महायुतीचे संख्याबळ निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र निर्माण झाले आहे.






