जम्मू : जम्मूतील अर्निया परिसरात कडाक्याची थंडी आणि बर्फाळ वाऱ्यांदरम्यान एका चौकात उभ्या असलेल्या शहीद जवानाच्या पुतळ्याजवळ दरवर्षी एक वेगळच दृश्य पाहायला मिळते. बीएसएफचे शहीद जवान गुरनाम सिंग यांच्या प्रतिमेजवळ त्यांची आई जसवंत कौर मुलाला थंडी वाजू नये म्हणून मुलाच्या अंगावर जाड पांघरूण टाकत असते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. ज्यात आईची माया ओसंडून वाहताना दिसत आहे.
अर्निया येथे २०२१ मध्ये बीएसएफच्या १७३व्या बटालियनचे जवान गुरनाम सिंग यांचा पुतळा उभारण्यात आला होता . हा पुतळा देशासाठी बलिदान दिलेल्या जवानाच्या सन्मानार्थ उभारण्यात आला आहे. मात्र, आई जसवंत कौर यांच्यासाठी हा पुतळा अजूनही त्यांचा मुलगाच आहे . त्यामुळे गेल्या ३ वर्षांपासून हिवाळा सुरू होताच आपल्या मुलाला थंडी वाजू नये म्हणून त्या पुतळ्यावर जाड पांघरूण टाकतात.
गुरनाम सिंग नक्की कोण होते?
हिरानगर सेक्टरमध्ये २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी गुरनाम सिंग यांनी दहशतवाद्यांना रोखत एक दहशतवादी ठार केला आणि शत्रूच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तानच्या हल्ल्यात गुरनाम सिंग शहीद झाले. गुरनाम सिंग जेव्हा शहीद झाले तेव्हा त्यांचे वय अवघे २६ वर्षे होते.
ते शाहिद झाल्यानंतरही गुरनाम सिंग यांचे कुटुंब त्यांच्या आठवणी जपत आहेत हे या व्हिडीओ मधून दिसत आहे. शेवटी आईचं काळीज... आईपासून तिचं मुलं कितीही लांब गेलं तरी आईला काळजी कायमच असते हे या व्हिडीओ मधून अधोरेखित होत आहे.