अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या १२ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत ही अधिकृत माहिती दिली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत हा भव्य प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
"ते केवळ शास्त्रज्ञ नव्हते, तर 'जनतेचे वैज्ञानिक' होते"; मुख्यमंत्र्यांनी जागवल्या डॉ. गाडगीळांच्या आठवणी मुंबई : पर्यावरण संवर्धन आणि संतुलनासाठी ...
विकासासाठी भाजपचा पर्याय!
अंबरनाथ शहराच्या रखडलेल्या विकासाला गती देण्यासाठी आणि मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आम्ही भाजपमध्ये जात आहोत, अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. विशेष म्हणजे, या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे निलंबित ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. नगरसेवकांसोबतच काँग्रेसचे अनेक आजी-माजी पदाधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने अंबरनाथमध्ये काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्षांची दिशाभूल झाली - प्रदीप पाटील
नगरसेवकांची बाजू मांडताना प्रदीप पाटील म्हणाले की, "आम्ही केवळ शहराच्या हितासाठी 'अंबरनाथ विकास आघाडी' स्थापन केली होती. मात्र, काही घटकांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची दिशाभूल केली. पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता थेट कारवाई केल्यामुळे आम्ही आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे." या राजकीय भूकंपामुळे अंबरनाथ नगरपालिकेत भाजपचे पारडे जड झाले असून आगामी काळात शहराच्या सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.