मुंबई : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. १५ जानेवारी रोजी २९ महापालिकेसाठी मतदान होणार आहे. आयोगाकडून मतदान प्रक्रियेला वेग आला आहे. महापालिका निवडणुका सुलभ करण्यासाठी निगोटीबल इनस्ट्रूमेंटस अॅक्टअंतर्गत राज्य सरकारने महाराष्ट्रात १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबई महापालिकाअंतर्गत येणाऱ्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील जिल्ह्यांसह पुणे आणि राज्यातील २९ महानगरपालिकेत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी महापालिकेचे मतदान होणार आहे, त्या सर्व ठिकाणी गुरूवारी शाळा, सरकारी कार्यलयाला सुट्टी देण्यात आली आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या सर्व महापालिकेचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येत आहे. ३० डिसेंबर २०२५ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवनागी होती. तर २ जनेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेता येत होता. मुंबई आणि इतर महापालिकेसाठी राज्यात प्रचार वेगात सुरू आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजप-शिंदेसेना आणि ठाकरेसेना-मनसे यांच्यात चूरस पाहायला मिळत आहे. १६ जानेवारी रोजी राज्यात कोण कोणत्या महापालिकेवर कब्जा मिळवतो, हे निश्चित होणार आहे. सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आहे.
शेअर बाजार आणि बँका सुरुच राहणार
सरकारने डिसेंबरमध्ये राज्य सरकारने २०२६ मधील २४ सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली होती. त्या यादीमध्ये १५ जानेवारीच्या सुट्टीचा समावेश नव्हता. सार्वजनिक सुट्टी फक्त महापालिका निवडणुका होत असलेल्या ठिकाणीच असेल, असे राज्य सरकारकडून एका प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे. दरम्यान, १५ जानेवारी रोजी बँका सुरू राहणार असल्याचे समजतेय. कारण, आरबीआयकडून अद्याप १५ जानेवारीच्या सुट्टीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे शेअर बाजार आणि बँका १५ जानेवारी रोजी सुरूच राहणार आहेत.