Thursday, January 8, 2026

जुन्या हेरिटेज बंगल्याची २५० कोटी रुपयांना होणार विक्री!

जुन्या हेरिटेज बंगल्याची २५० कोटी रुपयांना होणार विक्री!

जुहू बीचच्या किनाऱ्यावर वास्तुकलेमुळे आणि किमती परिसरामुळे शहरातील मौल्यवान मालमत्ता

मुंबई : मुंबईतील सर्वात पॉश भागांपैकी एक असलेल्या जुहूमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. जुहू बीचच्या किनाऱ्यावर असलेला 'लीला' नावाचा एक भव्य आणि ऐतिहासिक ६ बीएचके बंगला २५० कोटी रुपयांच्या भरभक्कम किमतीत विक्रीसाठी बाजारात आला आहे. हा बंगला आपल्या हेरिटेज वास्तुकलेमुळे आणि प्राईम लोकेशनमुळे शहरातील सर्वात मौल्यवान मालमत्तांपैकी एक मानला जात आहे.

हा व्यवहार अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मुंबईतील जुहूसारख्या भागात जिथे जमिनीची मोठी कमतरता आहे, तिथे अशा प्रकारचे स्वतंत्र आणि ऐतिहासिक बंगले मिळणे अत्यंत दुर्मीळ आहे. २५० कोटी रुपयांची ही संभाव्य विक्री केवळ जुहूच्या रिअल इस्टेट मार्केटची ताकदच दर्शवत नाही, तर अल्ट्रा-लक्झरी प्रॉपर्टी सेगमेंटमध्ये खरेदीदारांची आवड कायम असल्याचेही संकेत देते. साधारणपणे अशा मालमत्ता मोठ्या उद्योगपतींची, कॉर्पोरेट दिग्गजांची किंवा बॉलिवूडमधील नामवंत व्यक्तींची पहिली पसंती असतात. हा बंगला खरेदी करण्यासाठी अनेक जण मोठी बोली लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

काय आहेत या आलिशान बंगल्याची वैशिष्ट्ये?

रिपोर्टनुसार, १९५० च्या दशकात आर्ट डेको शैलीत बांधलेला हा ‘ग्राउंड प्लस टू’ बंगला १४ हजार ८५८ स्क्वेअर फुटांच्या विस्तीर्ण प्लॉटवर पसरलेला आहे. या मालमत्तेचे एकूण बिल्ट-अप क्षेत्र सुमारे ८ हजार ४८० स्क्वेअर फूट आहे. यामध्ये दोन लिव्हिंग रूम, एक डायनिंग रूम, सहा बेडरूम आणि दोन व्हरांडे आहेत. बंगल्यामध्ये समुद्राकडे तोंड असलेली बाल्कनी आणि एक सुंदर सी-फेसिंग गार्डन आहे. येथे कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी एक खोली आणि चार कार पार्किंगसाठी पुरेशी जागा देण्यात आली आहे. बंगल्याची गच्ची २ हजार ६५३ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली असून तिथून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.

ग्रेड आयआयबी हेरिटेज मालमत्ता म्हणून लिस्टेड

ग्रेड आयआयबी हेरिटेज मालमत्ता म्हणून लिस्टेड असलेला हा बंगला मुंबईच्या प्रतिष्ठित जुहू बीचच्या अगदी जवळ आहे. १९५० च्या दशकात बांधलेल्या या शानदार मालमत्तेची मालकी नानावटी कुटुंबाकडे आहे, जे मुंबईतील विलेपार्ले येथील प्रसिद्ध नानावटी हॉस्पिटलचे प्रवर्तक आहेत. आता या कुटुंबाने हा ऐतिहासिक बंगला विक्रीसाठी बाजारात आणला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा