मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा धुरळा उडाला असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार असतानाच, नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ (अ) मधील निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे या प्रभागात नियोजित तारखेला मतदान होणार की नाही, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडून फेटाळण्यात आला होता. या निर्णयाविरोधात भोजने यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांच्या याचिकेची दखल घेत त्यांना मोठा दिलासा दिला असून, संबंधित प्रभागातील निवडणूक प्रक्रियेला तूर्तास स्थगिती दिली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी होणार असून, त्यानंतरच येथील मतदानाचे भवितव्य स्पष्ट होईल. दुसरीकडे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात सुमारे ७० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले असून, काही नेत्यांनी या प्रक्रियेविरोधात न्यायालयातही दाद मागितली आहे. प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असतानाच न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सत्तेत येताना युक्रेन युद्ध थांबवण्याचे आणि जगात शांतता प्रस्थापित करण्याचे ...
प्रभाग १७ (अ) ची निवडणूक तूर्तास स्थगित
प्रभाग क्रमांक १७ (अ) मधील भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात महत्त्वपूर्ण हस्तक्षेप केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांचा हा निर्णय 'प्रथमदर्शनी बेकायदेशीर आणि मनमानी' असल्याचे ताशेरे ओढत, न्यायालयाने या प्रभागातील निवडणूक प्रक्रियेला पुढील आदेश येईपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे. निलेश भोजने यांच्या मालमत्तेवर अनधिकृत बांधकाम असल्याचा ठपका ठेवत, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायद्याच्या कलम १०(१ ड) नुसार त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख किशोर पाटकरांनी याविरोधात तक्रार केली होती. मात्र, हे कलम निवडून आलेल्या नगरसेवकांना लागू होते की उमेदवारांना, या कायदेशीर मुद्द्यावर भोजनेंनी न्यायालयात दाव केला. उच्च न्यायालयाने निलेश भोजने यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत, निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. निवडणुकीवर परिणाम या स्थगितीमुळे १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेत प्रभाग १७ (अ) साठी तूर्तास ब्रेक लागला आहे. न्यायालयाने निवडणूक आयोग, महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया पुढे न नेण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार असून, संपूर्ण नवी मुंबईचे लक्ष आता न्यायालयाच्या अंतिम निकालाकडे लागले आहे.
दरम्यान, नवी मुंबईत भाजपच्या उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज बाद झाल्याने प्रभाग १७ अ मधील भाजपची उमेदवारी संकटात सापडली होती. मात्र, पक्षाने वेळ न दवडता रणनीती बदलत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दर्शन भोईर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपने या प्रभागात आपला पॅनल उभा केला असून, थेट शिवसेना (शिंदे गट) यांच्या उमेदवारांविरोधात थेट लढत आहे. दर्शन भोईर यांनी भाजपातील पक्षप्रवेशानंतर भाजपच्या विचारधारेनुसार काम करून मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, या घडामोडीमुळे प्रभाग १७ अ मधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मात्र, आता भोजने यांना न्यायालायने दिलासा दिल्याने आता पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.