मुंबई :भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने आपल्या सागरी संचालनाच्या एंड-टू-एंड डिजिटलीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत सर्वसमावेशक, कागदविरहित हार्बर मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित केली आहे.
सागरी संचालनातील विस्तृत स्वरूप आणि डेटा सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन जेएनपीएने मानक स्वरूपातील उपलब्ध उपाय स्वीकारण्याऐवजी बंदरे, जलमार्ग आणि किनारपट्टीसाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्र (एनटीसीपीडब्ल्यूसी) यांच्यासोबत भागीदारी करून स्वदेशी हार्बर मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करण्याचा निर्णय घेतला. ही प्रणाली जहाज वेळापत्रक नियोजन, पायलटेज माहिती, संसाधनांचे वाटप,आयओटी-आधारित इनपुट्स, सुरक्षितता निरीक्षण तसेच शाश्वतता मापन यांचा एकात्मिक समावेश करून जागतिक मानकांशी सुसंगत असा एकसंध कार्यप्रवाह प्रदान करते.
याचबरोबर जेएनपीए यांनी स्वतःची स्वतंत्र आयव्हीटीएस (इंटिग्रेटेड व्हेसल ट्रॅफिक सिस्टीम) कार्यान्वित केली असून, याआधी मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून राबविण्यात आलेल्या आणि वॉर्टसिला यांच्या सेवांवर आधारित व्हीटीएस व्यवस्थेपलीकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आयव्हीटीएस द्वारे एआयएस-आधारित जहाज माहिती संकलन आधीच सुरू झाले असून, प्रणाली पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर ती टर्मिनल ऑपरेटर आणि सेवा पुरवठादारांना वास्तविक वेळेत कार्यरत दृश्य उपलब्ध करून देईल. यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि परिणामकारक होण्यास मदत मिळेल.