विजय हजारे करंडक : मुंबई, कर्नाटक, सौराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत दाखल
मुंबई : विजय हजारे करंडक २०२५-२६ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. या सामन्यांच्या निकालानंतर बाद फेरीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. सौराष्ट्र, कर्नाटक आणि मुंबई यांसारख्या बलाढ्य संघांनी मोठे विजय मिळवत आपला दबदबा कायम ठेवला, तर काही सामन्यांचे निकाल अत्यंत चुरशीचे लागले.
या सामन्यात मुंबईने हिमाचल प्रदेशवर केवळ ७ धावांनी निसटता विजय मिळवला. हिमाचल प्रदेशने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. मुंबईकडून यशस्वी जयस्वाल आणि मुशीर खान यांनी डावाची सुरुवात केली. पण जयस्वाल १५ धावांवरच बाद झाला. त्यानंतर मुशीर खानला त्याचा भाऊ सर्फराज खान साथ देण्यासाठी आला. सर्फराजने आक्रमक फलंदाजी करताना १० चेंडूंत २१ धावांची आक्रमक खेळी केली. पण त्यानंतर तो बाद झाला. त्यामुळे श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. एकीकडे मुशीर आक्रमक खेळत असताना दुसरीकडे श्रेयस संयमी खेळ करत होता. या दोघांमध्ये ५४ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी झाली. यादरम्यान मुशीरने अर्धशतक पूर्ण केले. पण त्याला कुशल पलने बाद केले. त्याने ५१ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७३ धावांची खेळी केली.
त्यानंतर मात्र श्रेयस अय्यरने वादळी खेळ केला. त्याला सूर्यकुमार यादवने साथ दिली. सूर्यकुमार २४ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस शतकही करेल, असं वाटत होते. मात्र २६ व्या षटकात तो कुशल पलविरुद्ध खेळताना अमनप्रीत व्ही सिंगकडे झेल देत बाद झाला. श्रेयसने ५३ चेंडूंत १० चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. या खेळीमुळे मुंबईने २५ षटकातच २२० धावांचा टप्पा पार केला होता. दरम्यान पावसामुळे ३३ षटकांचा करण्यात आलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबईने हिमाचल प्रदेशवर केवळ ७ धावांनी विजय मिळवला.
हैदराबादच्या अमन रावची द्विशतकी खेळी
हैदराबादच्या २१ वर्षीय सलामीवीर अमन राव याने विजय हजारे ट्रॉफीत धुमाकूळ घातला. मोहम्मद शमी, आकाश दीप व मुकेश कुमार या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना त्याने चांगलाच चोप दिला. बंगालविरुद्ध त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून आपले द्विशतक पूर्ण केले. तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरलेल्या हैदराबादला अमन व राहुल सिंग गहलौत आश्वासक सुरुवात करून दिली. १६ व्या षटकात १०४ धावांची ही भागीदारी संपुष्टात आली आणि राहुलला ५४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावांवर माघारी जावे लागले. त्यानंतर कर्णधार तिलकसोबत दुसऱ्या विकेटसाठी अमनने ९७ चेंडूंत ८७ धावा जोडल्या. तिलक ४५ चेंडूंत ३४ धावांवर माघारी परतला. दरम्यान बंगालचा संघ लक्ष्याचा पाठलाग करताना निष्प्रभ ठरला.
शुभमन गिल स्वस्तात बाद : धुक्यामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात गोव्याने प्रथम फलंदाजी करताना ३३.३ षटकांत सर्वबाद २११ धावा केल्या. सुयश प्रभुदेसाई (६६ धावा) आणि ललित यादव (५४ धावा) यांनी दिलेले योगदान वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. अर्जुन तेंडुलकर केवळ १ धाव काढून बाद झाला. २१२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या पंजाब संघाची सुरुवात खराब झाली. पुनरागमन करणारा कर्णधार शुभमन गिल स्वस्तात (अवघ्या ७ धावांवर) बाद झाला, ज्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर सलामीवीर हरनूर सिंगने डावाची धुरा सांभाळली. त्याने नाबाद ९४ धावांची जबरदस्त खेळी करत पंजाबला विजय मिळवून दिला. पंजाबने २९ व्या षटकातच ४ गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे लक्ष्य पूर्ण केले.
सौराष्ट्र विरुद्ध सर्विसेस: फलंदाजांचा झंझावात
सौराष्ट्रने या सामन्यात आपल्या फलंदाजीच्या जोरावर वर्चस्व गाजवले. आक्रमक पवित्रा घेत सौराष्ट्रने ३४९ धावांचा डोंगर उभा केला आणि सर्विसेसचा १११ धावांनी मोठा पराभव केला. फलंदाजी करताना सौराष्ट्रच्या सलामीवीरांनी भक्कम सुरुवात करून दिली. मधल्या फळीतील फलंदाजांनी वेगवान धावा कुटल्यामुळे निर्धारीत ५० षटकांत त्यांनी ३४९/५ अशी मोठी धावसंख्या उभारली. यात चेतेश्वर पुजारा आणि अर्पित वसावडा यांच्या महत्त्वपूर्ण खेळींचा समावेश होता. ३५० धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना सर्विसेसच्या फलंदाजांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सौराष्ट्रच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. सर्विसेसचा डाव २३८ धावांत आटोपला.