Wednesday, January 7, 2026

शिवसेनेच्या प्रचारात ‘नवी मुंबई, नवे सरकार’ची घोषणा

शिवसेनेच्या प्रचारात ‘नवी मुंबई, नवे सरकार’ची घोषणा

नवी मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील राजकारण चांगलेच तापले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रचाराची सुरुवात करताना ‘नवी मुंबई, नवे सरकार’ अशी ठळक घोषणा दिली आहे. शिवसेनेने (शिंदे गट) प्रचाराच्या केंद्रस्थानी उमेदवार निवडीत मूळ भाजप इच्छुकांना डावलण्यात आल्याचा मुद्दा आणल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत भाजप–शिंदेसेनेची युती असली, तरी नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या भूमिकेमुळे युती न झाल्याचे चित्र आहे. जागावाटपाबाबत झालेल्या चर्चांनंतर नाईक यांच्यामार्फत दिलेला प्रस्ताव शिवसेनेला (शिंदे गट) मान्य न झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये थेट संघर्ष सुरू झाला आहे.

भाजपने नवी मुंबईत गणेश नाईक यांना पूर्ण अधिकार दिल्याने उमेदवार यादीत नाईक समर्थकांचा भरणा झाल्याचा आरोप होत आहे. यामुळे नाराज झालेल्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत उघडपणे नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) ‘नवी मुंबई, नवे सरकार’चा नारा देत ‘एकसंध लढूया’ असा संदेश दिला आहे. ही घोषणा संघ परिवाराला दिलेली साद असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले की, ''शिंदेसेनेने संघ परिवाराशी संबंधित उमेदवारांना संधी दिली असून भाजपच्या यादीत अशा उमेदवारांचा अभाव आहे.'' नवी मुंबईत ही लढाई शिवसेना–भाजप युतीची नसून ‘मूळ भाजपवासी विरुद्ध घराणेशाही’ अशी असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर शिंदेसेनेचा प्रचारही याच मुद्द्याभोवती केंद्रित झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment