Thursday, January 8, 2026

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. प्रसिद्ध 'वर्कप्लेस कल्चर' कन्सल्टिंग फर्म 'अवतार ग्रुप' तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘टॉप सिटीज फॉर विमेन इन इंडिया’ (TCWI) २०२५ च्या अहवालात मुंबईने ५ वे स्थान पटकावले आहे. या यादीत कर्नाटकची राजधानी बेंगळुरूने आपले पहिले स्थान कायम राखले आहे.

मुंबईची कामगिरी : औद्योगिक प्रगती मोठी, पण महागाईचे आव्हान

या सर्वेक्षणात मुंबईच्या कामगिरीचे दोन पैलू समोर आले आहेत. मुंबईचा 'औद्योगिक समावेशकता निर्देशांक' (IIS) तब्बल ६९.०० इतका उच्च आहे, जो महिलांसाठी उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणावरील रोजगाराच्या संधी दर्शवतो. मात्र, 'सामाजिक समावेशकता' (SIS) श्रेणीत मुंबई ३८.४४ गुणांसह काहीशी मागे पडली आहे. मुंबईतील घरांच्या वाढत्या किमती (Affordability) आणि वाहतुकीच्या पायाभूत सुविधांवरील ताण ही महिलांसाठी प्रमुख आव्हाने ठरत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॉप १० शहरांची क्रमवारी

२०२५ च्या या अहवालात १२५ शहरांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये खालील शहरांनी बाजी मारली आहे: १. बेंगळुरू (५३.२९ गुण)

२. चेन्नई (४९.८६ गुण)

३. पुणे (४६.२७ गुण)

४. हैदराबाद (४६.०४ गुण)

५. मुंबई (४४.४९ गुण) ६. गुरुग्राम, ७. कोलकाता, ८. अहमदाबाद, ९. तिरुवनंतपुरम, १०. कोईम्बतूर.

दक्षिण भारताचे वर्चस्व आणि उत्तर भारताची स्थिती

देशातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित आणि पोषक वातावरण देणाऱ्या पहिल्या १० शहरांपैकी ५ शहरे दक्षिण भारतातील आहेत. दक्षिण भारताचा सरासरी स्कोर २१.६० इतका असून तो देशात सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, उत्तर भारतातून केवळ गुरुग्राम हे एकमेव शहर टॉप १० मध्ये (६ वे स्थान) स्थान मिळवू शकले आहे. दिल्ली, गुरुग्राम आणि नोएडा येथे नोकऱ्या भरपूर असल्या तरी, सुरक्षा आणि सामाजिक निकषांवर ही शहरे मागे आहेत.

पुणे तिसऱ्या क्रमांकावर; महाराष्ट्राची छाप

महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे पुणे शहराने ४६.२७ गुणांसह देशात तिसरे स्थान पटकावले आहे. पुण्याने सामाजिक सुरक्षा आणि औद्योगिक वाढ या दोन्ही बाबतीत उत्तम समतोल साधला आहे, असे अहवालात म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा