ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ जानेवारीला ठाण्यात येत आहेत. शहराच्या विकासाबाबत नागरिकांच्या मनातील प्रश्न, अपेक्षा आणि ठाण्याच्या सर्वांगीण प्रगतीवर चर्चा करण्यासाठी राम गणेश गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ७ वाजता विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी याबाबत माहिती दिली.
ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना–रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) महायुतीच्या माध्यमातून लढत होत असून, केंद्र सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारने ठाण्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. या चर्चासत्रात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी केले आहे.






